सिडको घरांच्या किमती ६ लाखांनी झाल्या कमी
By कमलाकर कांबळे | Published: January 25, 2024 07:43 PM2024-01-25T19:43:48+5:302024-01-25T19:44:04+5:30
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर ग्राहकांना दिलासा.
नवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून २०२२ मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर उलवे येथील बामणडोंगी आणि खारकोपर रेल्वेस्थानक परिसरात जाहीर केलेल्या महागृहनिर्माण योजनेतील घरांच्या किमती ६ लाखांनी कमी करण्याचा निर्णय शासनाच्या माध्यमातून सिडकोने घेतला आहे. त्यामुळे या योजनेतील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानासह यशस्वी ग्राहकांना आता ही घरे अवघ्या २७ लाखांत उपलब्ध होणार आहेत. पूर्वी या घरांची किमत ३५ लाख ३० हजार रुपये इतकी होती.
सिडकोने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी खारकोपर आणि बामणडोंगरी रेल्वेस्थानकाच्या परिसरात ७८४९ घरांची योजना जाहीर केली होती. या योजनेची १७ फेब्रुवारी २०२३ मध्ये संगणकीय सोडत काढण्यात आली. परंतु या प्रकल्पातील घरांच्या किमती अधिक असल्याचा सूर यशस्वी ग्राहकांनी लावला होता. इतकेच नव्हे, तर घरांच्या किमती कमी कराव्यात, यासाठी मुख्यमंत्र्यांसह विविध पातळीवर पाठपुरावा केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर सिडकोने पंतप्रधान आवास योजनेच्या घराच्या किमती कमी करण्याच्या त्यादृष्टीने चाचपणी सुरू केली होती. विशेष म्हणजे तशा आशयाचा सविस्तर प्रस्ताव सिडकोच्या संबंधित विभागाने नगरविकास विभागाकडे पाठविला होता. परंतु मागील सहा महिन्यांपासून हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. अखेर प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार सिडकोने बामणडोंगरी प्रकल्पातील घरांच्या किमती सहा लाखांनी कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
४८६९ अर्जदारांना मिळणार लाभ
सिडकोने खारकोपर आणि बामणडोंगरी रेल्वेस्थानक परिसरातील ७८४९ घरांची सोडत काढली होती. त्यापैकी बामणडोंगरी प्रकल्पातील ४८६९ घरे पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत. त्यावेळी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उत्पन्न मर्यादा ३ लाखांपर्यंत होती. त्यामुळे ३५ लाख किंमत असलेल्या घरासाठी पैसे उभे करण्यास अर्जदारांना अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन या प्रकल्पातील सदनिकांच्या किमती कमी करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने सिडकोला दिले होते. त्यानुसार सिडकोने घरांच्या किमती ६ लाखांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या २.५ लाख रकमेच्या अनुदानासह आता या सदनिका २७ लाखांना उपलब्ध होणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.
प्रतिक्रिया
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देेशानुसार सिडकोच्या बामणडोंगरी महागृहनिर्माण प्रकल्पातील घरांच्या किमती ६ लाखांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेतील यशस्वी अर्जदारांना त्यामुळे नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे या अर्जदारांचे नवी मुंबईत हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
- अनिल डिग्गीकर, व्यवस्थापकीय संचालक, सिडको