सिडकोच्या घरांची सोडत पुन्हा लांबणीवर; विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा

By कमलाकर कांबळे | Published: June 6, 2024 09:23 PM2024-06-06T21:23:33+5:302024-06-06T21:23:42+5:30

नवी मुंबई : सिडकोच्या घरांची सोडत पुन्हा लांबणीवर पडली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ती ७ जून रोजी जाहीर केली ...

CIDCO housing lots delayed again; Impediment of Code of Conduct for Legislative Council Elections | सिडकोच्या घरांची सोडत पुन्हा लांबणीवर; विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा

सिडकोच्या घरांची सोडत पुन्हा लांबणीवर; विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा

नवी मुंबई : सिडकोच्या घरांची सोडत पुन्हा लांबणीवर पडली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ती ७ जून रोजी जाहीर केली होती. त्यानुसार संबंधित विभागाने तयारीही केली होती. मात्र, ३१ मेपासून विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता घरांची सोडत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सिडकोने आपल्या पोर्टलवर याबाबतची सूचनाही प्रसारित केली आहे. त्यामुळे या गृहयोजनेत अर्ज केलेल्या ग्राहकांना सोडतीसाठी आणखी एक महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

गेल्या पाच वर्षांत सिडकोने विविध घटकांसाठी विविध गृहयोजनांच्या माध्यमातून जवळपास तीस हजार घरांची योजना जाहीर करून त्यांची संगणकीय सोडत काढली आहे. मात्र, विविध कारणांमुळे हजारो घरे विक्रीविना पडून आहेत. विशेष म्हणजे, यातील सर्वाधिक घरे तळोजा आणि द्रोणागिरी नोडमध्ये आहेत. त्यापैकी ३,३२२ घरांची योजना प्रजासत्ताक दिनी जाहीर केली आहे. या घरांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत १६ एप्रिल होती. तर पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार संगणकीय सोडतीसाठी १९ एप्रिलचा दिवस निश्चित केला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे १९ एप्रिलची पूर्वनियोजित सोडत पुढे ढकलून ७ जूनचा मुहूर्त निश्चित केला.

आता निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल केली असली तरी विधान परिषदेच्या कोकण, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीची आचारसंहिता ५ जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे घरांची संगणकीय सोडत त्यानंतरच म्हणजेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात काढली जाईल, असे सिडकोने स्पष्ट केले आहे.

- उपलब्ध घरांचा तपशील
विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या ३,३२२ घरांपैकी द्रोणागिरी नोडमध्ये ६१ तर तळोजामध्ये २५१ अशा एकूण ३१२ सदनिका पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत. द्रोणागिरीतील ३७४ व तळोजा नोडमधील २,६३६ अशा एकूण ३,०१० सदनिका या सर्वसाधारण घटकांसाठी उपलब्ध आहेत. यापैकी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या ३१२ सदनिकांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे; मात्र संबंधित विभागाच्या विविध प्रयत्नांनंतरही सर्वसाधारण घटकांसाठी असलेल्या ३,०१० सदनिकांना अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे या घरांची विक्री करण्याचे मोठे आव्हान सिडकोसमोर उभे ठाकले आहे.

Web Title: CIDCO housing lots delayed again; Impediment of Code of Conduct for Legislative Council Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cidcoसिडको