लोकमत न्यूज नेटवर्क I नवी मुंबई महागृहनिर्माण योजनेतील विविध कारणांमुळे शिल्लक राहिलेल्या तळोजा नोडमधील २५०० घरांची १५ ऑगस्टला सोडत काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. विशेष म्हणजे होळीच्या मुहूर्तावर या घरांसाठी योजना जाहीर केली होती; परंतु, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यातील शिल्लक राहिलेल्या सुमारे अडीच हजार घरांसाठी पुन्हा सोडत काढण्याचा निर्णय संबंधित विभागाने घेतल्याचे समजते.
कोरोनामुळे केंद्राची योजना रेंगाळलीकेंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेंतर्गत सिडकोने २०१८ मध्ये सुमारे पंधरा हजार घरांची योजना जाहीर केली होती. त्यानंतर लगेच कोरोनाची महामारी आल्याने ही योजना रेंगाळली. परिणामी अनेक लाभार्थींनी ही घरे घेण्यास असमर्थता दर्शविली तसेच आवश्यक कागदपत्रांचा अभाव आणि इतर कारणांमुळे यातील जवळपास सात हजार घरे शिल्लक राहिली होती. ती विकण्यासाठी सिडकोने विविध योजना जाहीर केल्या. कोविड योद्धा आणि पोलिसांसाठी विशेष योजना जाहीर करून शिल्लक घरे विकण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यालाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
सुविधांचा अभावहोळीच्या मुहूर्तावर विविध नोडमध्ये शिल्लक राहिलेल्या ६,५०८ घरांची योजना जाहीर केली. त्यात सर्वाधिक म्हणजेच ५,७७५ घरे एकट्या तळोजा नोडमधील होती. या योजनेची सिडकोने मोठी जाहिरातबाजी केली. परंतु, तळोजा येथील पायाभूत सुविधांचा अभाव, पाण्याचा प्रश्न, दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा आदींमुळे ग्राहकांनी पुन्हा येथील घरांकडे पाठ फिरविल्याचे बोलले जात आहे.
या सदनिका विकण्याचे मोठे आव्हानया सदनिका विकण्याचे मोठे आव्हान सिडकोच्या संबंधित विभागासमोर उभे ठाकले आहे. कारण शिल्लक घरांची विक्री केल्याशिवाय नवीन घरांची योजना जाहीर करणे व्यवहार्य ठरणार नसल्याने सिडकोची कोंडी झाली आहे. त्यामुळेच स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर शिल्लक राहिलेल्या अडीच हजार घरांची नव्याने सोडत काढण्याचा निर्णय संबंधित विभागाने घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
६,५०८ घरांची योजना होळीच्या मुहूर्तावर जाहीर केली होती
५,७७५ घरे एकट्या तळोजा नोडमधील होती
२५०० घरांची १५ ऑगस्टला सोडत