सिडकोत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेशबंदी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 12:25 AM2021-04-14T00:25:52+5:302021-04-14T00:26:30+5:30
CIDCO : सर्वसामान्य नागरिकांसह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनासुद्धा सिडको कार्यालयात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
नवी मुंबई : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्य सरकारने सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालयात अभ्यागतांना प्रवेशबंदी केली आहे. त्यानुसार सिडकोनेसुद्धा निर्देश जारी केले आहेत. सर्वसामान्य नागरिकांसह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनासुद्धा सिडको कार्यालयात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सिडकोने त्यासाठी ई-व्हिजिटर्स प्रणालीचा अवलंब केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार हा निर्णय घेतल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले. सिडकोच्या सीबीडी-बेलापूर येथील मुख्यालयात अभ्यागतांची नेहमीच गर्दी असते. विविध कामांनिमित्त येणाऱ्या सामान्य नागरिकांसह ठेकेदार, कंत्राटदार, राजकीय नेते आदींचा या ठिकाणी सतत वावर असतो. त्याशिवाय सिडकोच्या नोडल कार्यालयातसुद्धा नेहमीच गर्दी पाहावयास मिळते. मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ४ एप्रिलपासून मिशन ‘ब्रेक द चेन’ मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत ५ एप्रिलपासून शासकीय व निमशासकीय कार्यालयांसह खासगी कार्यालयातील गर्दीला आवर घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सुचविण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विविध कामांनिमित्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना आता मज्जाव करण्यात आला आहे. हे करीत असताना कोणतेही काम रेंगाळू नये, त्यासाठीसुद्धा पर्यायी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सिडकोनेसुद्धा या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार शासनाच्या पुढील आदेशापर्यंत सिडकोच्या सर्व कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
संकेतस्थळावर विस्तृत माहिती
- नागरिकांची कामे रखडू नयेत, त्यांना संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधता यावा यादृष्टीने सिडकोने ई-व्हिजिटर्सप्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीबाबत सिडकोच्या संकेतस्थळावर विस्तृत माहिती देण्यात आली आहे.
त्याशिवाय संबंधित विभाग प्रमुखांना भेटण्यासाठी इतर व्हर्च्युअल प्रणालींचासुद्धा अवलंब करता येणार आहे. हा नियम सर्व घटकांना लागू आहे. विविध प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनासुद्धा या नियमांचे पालन बंधनकारक असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.