सिडकोचा मेगा गृहप्रकल्प : घरांसाठी पहिल्याच दिवशी २,२१७ अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 02:39 AM2018-08-16T02:39:34+5:302018-08-16T02:39:49+5:30
सिडकोच्या १४८३८ घरांसाठी स्वातंत्र्यदिनापासून आॅनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. पहिल्याच दिवशी २,२१७ ग्राहकांनी आॅनलाइन अर्ज सादर केले आहेत.
नवी मुंबई - सिडकोच्या १४८३८ घरांसाठी स्वातंत्र्यदिनापासून आॅनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. पहिल्याच दिवशी २,२१७ ग्राहकांनी आॅनलाइन अर्ज सादर केले आहेत. तर तीन दिवसांत १५,७७२ ग्राहकांनी सिडकोच्या संकेतस्थळावर घरासाठी नोंदणी केली आहे. आतापर्यंत तब्बल ३६८०० लोकांनी या संकेतस्थळाला भेट देऊन योजनेची माहिती घेतली आहे.
सिडकोने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाची सोमवारी घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला. सोमवारी दुपारपासून वेबसाइट नोंदणीसाठी खुली करण्यात आली. पहिल्या दिवशी १४५८६ ग्राहकांनी वेबसाइटला भेट देऊन गृहयोजनेची माहिती घेतली होती. तर दुपारनंतर तब्बल ४४५० ग्राहकांनी नोंदणी केली होती. १५ आॅगस्टच्या दुपारपासून अर्ज स्वीकारण्याची आॅनलाइन प्रक्रिया सुरू झाली. पहिल्याच दिवशी संध्याकाळपर्यंत तब्बल २,२१७ ग्राहकांनी प्रत्यक्ष अर्ज सादर केले आहेत. आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी अगोदर पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत १५,७७२ ग्राहकांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे १७ सप्टेंबरपर्यंत आॅनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पहिल्याच दिवशी मिळालेला प्रतिसाद पाहता ही योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.
सिडकोने यापूर्वी बांधलेल्या गृहप्रकल्पातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमतीपेक्षा या वेळी घरांच्या किमती दोन ते अडीच लाखांनी कमी करण्यात आल्या आहेत. सर्वांसाठी घरे या धोरणानुसार या गृहप्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील घराची किंमत १८ लाख तर अल्प उत्पन्न गटासाठीच्या घराची किमत २५ लाख रुपये इतकी आहे. शिवाय पंतप्रधान रोजगार आवास योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या अत्यल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना अडीच लाख रुपयांचे अनुदानही मिळणार आहे. त्यामुळेच या प्रकल्पातील घरांना विक्रमी प्रतिसाद मिळेल, असे सिडकोला वाटते.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तळोजा येथे २८६२, खारघरमध्ये ६८४, कळंबोलीत ३२४, घणसोलीत ५२८ तर द्रोणागिरीत ८६४ सदनिका आहेत. अल्प उत्पन्न घटकांसाठी तळोजा येथे ५,२३२, खारघर १२६0, कळंबोली येथे ५८२, घणसोलीमध्ये ९५४ तर द्रोणागिरीत १५४८ घरे आहेत. सर्वाधिक सदनिका तळोजा येथे बांधण्यात येत आहेत.