नवी मुंबई - सिडकोच्या मेगा गृहप्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सिडकोने पंधरा हजार घरांसाठी पहिल्यांदाच आॅनलाइन अर्ज मागविले होते. त्यासाठी तब्बल १ लाख ९१ हजार अर्ज दाखल झाले आहेत. प्राप्त अर्जांची छाननी करून सोडतीसाठी पात्र ठरणाऱ्या अर्जांची यादी उद्या सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. तर या योजनेत अपात्र ठरलेल्या अर्जदारांना सूचना व हरकती नोंदविण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली जाणार आहे.सिडकोचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा गृहप्रकल्प आहे. खारघर, तळोजा, कळंबोली, द्रोणागिरी आणि घणसोली या पाच नोडमध्ये एकाच वेळी या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. १५८३८ घरांपैकी ५२६२ घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरीता आरक्षित आहेत. तर ९५७६ घरे अल्प उत्पन गटासाठी आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गतच्या लाभधारकांना घरासाठी अडीच लाखाचे अनुदान मिळणार आहे. या घरांसाठी १५ आॅगस्टपासून आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. १६ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. या कालावधीत २ लाख २७ हजार अर्जदारांनी आॅनलाइन अर्ज भरले. अनामत रक्कम भरण्यासाठी १७ सप्टेंबर संध्याकाळी ६ पर्यंतची वेळ देण्यात आली होती. या मुदतीत एक लाख ९१ हजार ८४२ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. अनामत रक्कम भरून प्रक्रिया पूर्ण केलेल्या अर्जांची छाननी पूर्ण झाली असून २५ सप्टेंबर रोजी ही यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर २ आॅक्टोबर रोजी या मेगा गृहप्रकल्पाची संगणकीय सोडत काढली जाणार आहे.दरम्यान, या योजनेत पात्र ठरलेल्या अर्जदारांना २६ व २७ सप्टेंबर सकाळी १0 ते सायंकाळी ४.३0 वाजेपर्यंत सूचना व हरकती सादर करता येणार आहेत. त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी पात्र अर्जदारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल. अंतिम यादीतील अर्जदारांमधूनच २ आॅक्टोबर रोजी संगणकीय सोडत काढली जाणार आहे.
सिडको मेगा गृहप्रकल्प : पात्र अर्जदारांची यादी आज होणार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 3:36 AM