लोकमत न्यूज नेटवर्क उरण : उरण तालुक्यातील मागील सात वर्षांपासून रखडलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या विलंब शुल्काची ७ लाख ५१ हजार ४६ रुपयांची रक्कम सिडकोने भरल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी रविवारी टि्वटरवरून दिली आहे.उरण येथे प्रस्तावित १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी सिडकोने ५९८३.७९ चौरस मीटर जागा दिली आहे.उरण येथील बोकडवीरा - फुंडे गावादरम्यान असलेल्या सिडकोच्या मालकीच्या सेक्टर १५-(अ)मध्ये दिलेल्या जागेची सुमारे ८० लाख रुपये किंमत लावण्यात आली आहे. यापैकी बहुतांश किंमत अदा करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम शासनाकडून मुदतीत भरण्यात आलेली नाही. या विलंबामुळे सिडकोने रकमेवर विलंब शुल्काची आकारणी केली आहे. भुखंडाची उर्वरित रक्कम विलंब शुल्कासह भरण्याची मागणी सिडकोने केली आहे. यावर उर्वरित रकमेसह विलंब शुल्काची रक्कम सिडकोने माफ करण्याची मागणी राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आली होती, अशी माहिती रायगड जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. सुहास माने यांनी दिली.राज्याच्या आरोग्य विभागाच्या मागणीची दखल घेऊन सिडको अध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी यांनी विलंब शुल्काची रक्कम ७ लाख ५१ हजार ४६ रुपयांची रक्कम सिडकोने भरणा केली असल्याची माहिती मुखर्जी यांनी रविवारी टि्वटरवरून दिली आहे.निधीअभावी सात वर्षांपासून काम रखडले निधीअभावी मागील सात वर्षांपासून १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचे काम रखडले आहे. १०५ कोटी खर्चाच्या या प्रस्तावित रुग्णालयासाठी उरण परिसरात असलेल्या शासकीय जेएनपीटी, ओएनजीसी, बीपीसीएल, सिडको आदी प्रकल्प आणि कंपन्यांकडून निधी उभारण्याच्या सुचना शासनाकडून करण्यात आल्या होत्या. निधीअभावी मागील सात वर्षांपासून १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचे काम रखडले आहे. १०५ कोटी खर्चाच्या या प्रस्तावित रुग्णालयासाठी उरण परिसरात असलेल्या शासकीय जेएनपीटी, ओएनजीसी, बीपीसीएल, सिडको आदी प्रकल्प आणि कंपन्यांकडून निधी उभारण्याच्या सुचना शासनाकडून करण्यात आल्या होत्या.
उरण उपजिल्हा रुग्णालयासाठी सिडकोने भरले साडेसात लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 3:05 AM