नवी मुंबई : बजेटमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या गणशोत्सवाच्या मुहूर्तावर विविध घटकांसाठी पाच हजार घरांची योजना जाहीर करण्याच्या दृष्टीने सिडकोने चाचपणी सुरू केली आहे. वाशीसह जुईनगर आणि मानसरोवर येथील घरांचा यात समावेश आहे.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सर्वाधिक घरे सिडकोच्या माध्यमातून बांधली जात आहेत. यातील पहिल्या टप्प्यात २३ हजार ५०० घरे बांधून त्याची वाटपप्रक्रिया पूर्ण झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात ६७ हजार घरे प्रस्तावित आहेत. या घरांचा आराखडा तयार करून बांधकामासाठी कंत्राटदारही नेमले आहेत. त्यापैकी काही घरांचे बांधकाम सुरू झाले आहे.
विशेषतः कामोठे, जुईनगर रेल्वेस्थानक परिसरात कोर्ट एरिया तसेच वाशी येथील ट्रक टर्मिनलच्या जागेवर ती बांधली जात आहे. सध्या निर्मितीच्या प्रक्रियेत असलेल्या ३५ हजार घरांना महारेराची मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर पाच हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे.
या घरांची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने सिडकोने अनेक नव्या योजना जाहीर केल्या. त्याचा परिणाम म्हणून पहिल्या टप्प्यातील सर्व घरांचे वाटप आता पूर्ण झाले आहे. त्यामुळेच येत्या गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर घरांची नवीन योजना आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.