कमलाकर कांबळे, नवी मुंबई सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्यापाठोपाठ सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांचाही कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे. त्यामुळे त्यांचीही बदली निश्चित मानली जात आहे,तर मुख्य दक्षता अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे यासुध्दा सिडकोत अधिक काळ राहतील असे वाटत नाही. याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय विमानतळासह अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.संजय भाटिया यांचा सिडकोतील कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांची मुंबई पोर्ट ट्रस्टच्या (बीपीटी) अध्यक्षपदावर बदली करण्यात आली आहे. त्यानुसार भाटिया यांनी आपल्या नवीन पदाचा कार्यभारही स्वीकारला आहे. असे असले तरी त्यांनी सिडकोचा कार्यभार अद्याप सोडलेला नाही. भाटिया यांच्यापाठोपाठ पुढील महिन्यात व्ही. राधा यांनाही सिडकोत तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे नियमानुसार त्यांचीही बदली अटळ मानली जात आहे. तर प्रज्ञा सरवदे यासुध्दा सिडकोतून बाहेर पडण्याच्या विचारात असल्याचे समजते. यापार्श्वभूमीवर गेल्या दोन अडीच वर्षांत सिडकोने सुरू केलेल्या अनेक प्रकल्पांची गती थंडावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर भाटिया यांनी सक्षम व प्रामाणिक अधिकाऱ्यांची टीम बांधली.त्यानुसार त्यांनी सर्वप्रथम सह व्यवस्थापकीय संचालिका म्हणून व्ही. राधा यांना सिडकोत आणले. तर मुख्य दक्षता अधिकारी म्हणून डॉ. प्रज्ञा सरवदे यांची नियुक्ती केली. परस्पर समन्वयातून सिडकोचा कारभार हाकताना भाटिया यांनी गेल्या दोन अडीच वर्षांत विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नैना क्षेत्राच्या पहिल्या टप्प्याचा विकास आराखडा शासनाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. मेट्रोचा पहिला टप्पा प्रगतिपथावर आहे. जेएनपीटी प्रभावित क्षेत्राच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. सर्वसामान्यांसाठी ५५ हजार घरांची घोषणा करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे स्मार्ट दक्षिण नवी मुंबईचा ३५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. भाटियांच्या बदलीचा सर्वाधिक फटका या प्रकल्पांना बसणार आहे. भाटिया यांच्यापाठोपाठ व्ही.राधा आणि प्रज्ञा सरवदे यासुध्दा सिडकोतून बाहेर पडणार असल्याने हे सर्व प्रकल्प रेंगाळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सिडकोचे प्रकल्प रेंगाळणार!
By admin | Published: April 05, 2016 1:52 AM