वैभव गायकर,पनवेल:17 मार्च हा सिडकोचा स्थापना दिवस म्हणुन साजरा केला जातो.मात्र सिडको महामंडळ स्थापन करताना दिलेली आश्वासने अद्यापही हवेतच राहिली असुन सिडकोने स्थानिक प्रकल्पग्रस्तांना देशोधडीला लावल्याने 95 गाव नवी मुंबई नैना व इतर प्रकल्पग्रस्त संघटनांच्या वतीने रविवार दि.17 रोजी पनवेल उरण परिसरात सिडको विरोधात निदर्शन करीत हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
सीबीडी- बेलापुर,तळोजे,खारघर,कळंबोली या सिडको नोडसह नव्याने विकसित होत असलेल्या नैना प्रकल्पग्रस्तांनी पळस्पे,शिरढोण,सांगडे,बोर्ले,जसखार आदींसह अनेक गावातील प्रकल्पग्रस्तांनी सिडकोच्या निषेधाचे बॅनर,काळे झेंडे दाखवून सिडकोविरोधात आपला आक्रोश व्यक्त केला.नवी मुंबई शहर वसवून सिडको महामंडळ देशातील सर्वात श्रीमंत महामंडळ बनले मात्र ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी सिडकोने कवडीमोल किमंतीत संपादित केल्या ते शेतकरी आज देशो धाडीला लागले असल्याचा आरोप समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट सुरेश ठाकुर यांनी केला आहे.सिडको विरोधात नव्याने नैना प्रकल्पग्रस्तांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.
यामुळे नैना प्रकल्पग्रस्तांनी गावोगावी सिडकोचा निषेध केला असल्याचे नैना हटाव चा नारा देणारे माजी सरपंच अनिल ढवळे यांनी सांगितले.भविष्यात नैना विरोधात व्यापक आंदोलन पुकारले जाणार असल्याचेही ढवळे यांनी सांगितले. चौकट - स्थानिक नेत्यांवर रोष - प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न पाच दशकापासून प्रलंबित असताना प्रकल्पग्रस्त नेते स्थानिकांच्या प्रश्नाचा केवळ बाहू करत राहिले.शहरीकरण झाल्याने स्थानिक नेते शहरी मतदारांच्या आहारी गेले.वोट बँक लक्षात घेता स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे प्रकल्पग्रस्त नेते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही यावेळी प्रकल्पग्रस्तांनी केला.