लोकमत न्यूज नेटवर्कउरण : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी नवी मुंबई, रायगड, ठाणे, मुंबई आदी जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी जनता, लोकप्रतिनिधी गेली अनेक वर्षे करीत आहेत. त्याबाबतचा पत्रव्यवहार राज्य व केंद्र सरकारकडे करण्यात आला आहे. तरीसुद्धा सिडकोच्या संचालक मंडळाने लोकभावनेचा विचार न करता बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे नवी मुंबई, रायगड, ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
सिडकोच्या या कृतीचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. सरकारने यांचा गंभीरपणे विचार करावा, अशा प्रकारचे निवेदन अखिल आगरी समाज परिषद, एम. आय. डी. सी., सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समिती व विविध संघटनांच्यावतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना रविवारी देण्यात आले. उलवा नोडमधील मोरु नारायण म्हात्रे विद्यालयात आ. प्रशांत ठाकूर आणि आ. महेश बालदी यांच्या प्रयत्नातून सुरू केलेल्या कोविड सेंटरच्या उद्घाटनानिमित्त माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर रविवारी आले होते. त्यावेळी अखिल आगरी समाज परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे या प्रश्नांकडे लक्ष वेधले. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल येथील जनतेच्या मनात नितांत आदर आहे. त्यांचे व्यक्तीमत्वही उत्तुंग आहे. पण, ज्यांनी नवी मुंबई, रायगड, ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं. शौर्यशाली व गौरवशाली असा प्रचंड लढा देऊन प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिला. त्या भुमिपुत्राचेच नाव या विमानतळाला देणे संयुक्तिक ठरेल.
सिडकोच्या या नोकरशहांनी राजकीय दडपणाखाली हा निर्णय घेतल्याने, सिडको विरूध्द येथील जनतेच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर, आ. आशिष शेलार, आ. रवीशेठ पाटील व विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.