डीपीएस तलावप्रकरणी सिडकोने नवी मुंबई महापालिकेस पोलिसांत खेचले
By नारायण जाधव | Published: June 14, 2024 08:00 PM2024-06-14T20:00:12+5:302024-06-14T20:00:21+5:30
सिडकोविरोधात नवी मुंबई महापालिका, पर्यावरणप्रेमी, वनविभागात संताप
नवी मुंबई : घाटकोपर येथे एमिरेटसच्या विमानाने दिलेल्या धडकेत ३९ फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्यानंतर हळहळलेल्या ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी मे महिन्यात या गुलाबी पक्ष्यांचा अधिवास असलेल्या या डीपीएस तलावाची पाहणी करून आठवडाभरात त्यात येणारे भरतीचे पाणी रोखणारे चोक पॉइंट तोडण्यासाठी आठवडाभराचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर महापालिकेने चोक पॉइंट तोडले असले तरी बिथरलेल्या सिडकोने नवी मुंबई महापालिकेसह संबधित ठेकेदाराविरोधात पोलिसांत तक्रार करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
सिडकोच्या या तक्रारीनंतर आता सिडको, नवी मुंबई महापालिका, पर्यावरणप्रेमी आणि वनविभागात जुंपण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मे महिन्यात दिलेल्या भेटीप्रसंगी नाईक यांनी आठवडाभरात चोक पॉइंट (भरतीचा प्रवाह तलावात येण्यासाठी बुजविलेला मार्ग) तोडले नाहीत तर स्वत: मैदानात उतरून जेसीबी लावून ते तोडतील, असे सिडकोचे मुख्य अभियंता एन. सी. बायस आणि त्यांच्या सहकारी व नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यानंतर महापालिकेने हे चोक पाॅइंट तोडले असले तरीही सिडकोने आता उशिरा नवी मुंबई महापालिका आणि काम करणाऱ्या ठेकेदार मे. भारत उद्योग याच्याविरोधात तक्रार करून उचित कारवाईची मागणी केली आहे.
काय म्हटले आहे सिडकोच्या तक्रारीत..
नवी मुंबई महापालिकेने डीपीएस तलाव परिसरातील पूर्वीचे ३०० मिमी व्यासाचे पाइप आऊटलेट तोडून नवे ६०० मिमी व्यासाचे इनलेट/आऊटलेट काम केले आहे. तसेच महापालिकेने या ठिकाणी २८ मे २०२४ पासून १० हॉर्स पाॅवरचे दोन पंचसेट बसवून खाडीचे पाणी सिडको क्षेत्रात घेतले आहे. खाडीचे पाणी आत घेतल्याने परिसरातील सिडकाेच्या भूखंडांवर खारफुटी वाढून त्यांचा विकास करणे अशक्य होणार आहे. यामुळे सिडकोचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे आपल्या तक्रारीत सिडकोचे कार्यकारी अभियंता वाशी विभाग यांनी एनआरआय सागर पोलिसांत केलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे.
मग सिडकोच्या दोषी अधिकाऱ्यांचे काय?
डीपीएस तलावातील पाण्याचा प्रवाह रोखून सिडको अधिकाऱ्यांनी या ३० एकर तलाव क्षेत्राचे व्यापारीकरण करण्याचा आरोप आहे. तसेच येथे जलवाहतूक जेट्टी बांधण्यासाठी सिडकोने रस्ता बांधल्याने गुलाबी पक्ष्यांना अन्न मिळणे दुरापास्त होऊन ते इतरत्र भरकटून नवी मुंबईची फ्लेमिंगो सिटीची ओळख नष्ट होऊ शकते, यामुळे खारफुटी क्षेत्राचे व्यापारीकरण पाहणाऱ्या सिडकोच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी गणेश नाईक यांनी आपल्या भेटीत केली होती. मात्र, आता सिडकोनेच नवी मुंबई महापालिकेविराधोत तक्रार केल्याने त्यांच्या दोषी अधिकाऱ्यांचे काय, असा प्रश्न नॅटेकनेक्टचे बी. एन.कुमार यांनी विचारला आहे.
खारफुटी संवर्धन समितीने केली पाहणी
नॅटकनेक्ट फाउंडेशनच्या तक्रारीवरून न्यायालयाने नेमलेल्या खारफुटी संरक्षण आणि संवर्धन समितीने या तलावास भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयानेही पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ही पाश्वभूमी असतानाही सिडकोन हे पाऊल उचलल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.