गृहनिर्माण क्षेत्रात सिडकोची विक्रमी घोडदौड सुरूच; ७०० स्लॅबचे काम ५५५ दिवसांत केले पूर्ण
By कमलाकर कांबळे | Published: November 7, 2022 05:58 PM2022-11-07T17:58:09+5:302022-11-07T17:58:39+5:30
ऑगस्ट महिन्यात सिडकोने दिवसाला सरासरी १.०२ या वेगाने ४८९ दिवसांत ५०० स्लॅबचे काम पूर्ण केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई: मिशन ९६ अंतर्गत ९६ दिवसांत ९६ सदनिकांचे काम पूर्ण करून गृहबांधणी क्षेत्रात नवीन विक्रम करणाऱ्या सिडकोने आता ७०० स्लॅबचे काम अवघ्या ५५५ दिवसांत पूर्ण करून आपल्याच विक्रमाची पुनर्रावृत्ती केली आहे. स्लॅब टाकण्याचा दिवसाचा सरासरी वेग १.२६ इतका आहे. त्यापूर्वी म्हणजेच ऑगस्ट महिन्यात सिडकोने दिवसाला सरासरी १.०२ या वेगाने ४८९ दिवसांत ५०० स्लॅबचे काम पूर्ण केले होते.
सिडकोतर्फे महागृहनिर्माण योजनेंतर्गत विविध नोडमध्ये मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. या योजनेतील घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील घटकांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे घरांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता घरांचे बांधकाम कमी कालावधीत पूर्ण करण्यावर सिडकोचा भर आहे. यापूर्वी मिशन- ९६ अंतर्गत प्रीकास्ट या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून सिडकोने बामणडोंगरी स्थानकाच्या परिसरात केवळ ९६ दिवसांत ९६ सदनिकांचा समावेश असलेल्या १२ मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण केले आहे. सिडकोने केलेल्या या कामाचे जगभरातून कौतूक झाले होते. त्यानंतर प्रीकास्ट याच तंत्रज्ञानाचा वापर करीत सिडकोने तळोजा सेक्टर २८, २९, ३१ आणि ३७ मध्ये उभारण्यात येत असलेल्या इमारतींच्या ५०० स्लॅबचे काम अवघ्या ४८९ दिवसांत पूर्ण करून गृहनिर्माण क्षेत्रात आपले वेगळे अस्तित्व सिध्द केले आहे.
त्यानंतर आता याच विभागात ५५५ दिवसांत ७०० स्लॅबचे काम पूर्ण केले आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून बांधकामच्या दर्जाशी कोणतही तडजोड न करता सिडकोने हे काम पूर्ण केले आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सिडकोचे वास्तुशास्त्रज्ञ, नियोजनकार, अभियंते आणि प्रकल्प सल्लागारांसह इतर संबधित घटकांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून गृहनिर्माण योजनेतील घरांचे बांधकाम कमीत कमी कालावधीत पूर्ण करण्याचे सिडकोचे उद्दिष्ट आहे. हे करीत असताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. घरांचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्यासाठी बांधकाम क्षेत्रातील प्रगत व अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"