नवी मुंबई : सिडकोच्या घरांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ११ डिसेंबर रोजी संपत आहे. आतापर्यंत जवळपास ९६ हजार ग्राहकांनी अर्ज नोंदणी केली आहे. प्रत्येक घटकाला या प्रक्रियेत सहभाग घेता यावा, यादृष्टीने सिडकोने अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुलभ आणि सोपी केली आहे. यात बारकोड नसलेले रहिवासी प्रमाणपत्र आणि स्टॅम्प पेपरवर शपथपत्र देण्याची अट शिथिल केली आहे. त्यामुळे उर्वरित दिवसांत अधिकाधिक ग्राहकांना ऑनलाइन अर्ज सादर करणे शक्य होईल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.
वाटपपत्र देण्यापूर्वी बारकोड अलेले प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.
महारेराची ४३ हजार घरांना परवानगी
सिडको शहराच्या विविध नोडमध्ये २७ ठिकाणी ६७ हजार घरे बांधत आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४३ हजार घरांना ‘महारेरा’ची परवानगी मिळाली असून, त्यांचे बांधकामही प्रगतिपथावर आहे.
यातील २६ हजार घरांची योजना ११ ऑक्टोबरपासून सुरू केली आहे. यात १३ हजार घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, तर उर्वरित १३ हजार घरे अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. यातील सर्वाधिक म्हणजेच जवळपास ५० टक्के घरे एकट्या तळोजातील आहेत. त्याचबरोबर खांदेश्वर, मानसरोवर तसेच खारकोपर आणि बामणडोंगरी, वाशी आणि खारघरमधील घरांचा समावेश आहे.
नोंदणीसाठी ११ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
nसुरुवातीला ११ नोव्हेंबरपर्यंत ग्राहकांना नोंदणी करण्यास सांगितले होते.यादरम्यान राज्यात निवडणुकीचा माहोल असल्यामुळे ग्राहकांना घर घेण्यासाठी अधिक संधी देण्याच्या उद्देशाने अर्ज नोंदणीसाठी ११ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली.
nमुदतवाढीच्या निर्णयामुळे अर्जदारांना उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र इ. कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठीही पुरेसा अवधी मिळणार आहे.
वाटपावेळी प्रमाणपत्र अनिवार्य
ऑनलाइन नोंदणी करताना बारकोड असलेले प्रमाणपत्र सादर करण्याची अट शिथिल केली आहे. त्यामुळे आता बारकोड नसलेले रहिवास प्रमाणपत्रही ग्राह्य धरले जाणार आहे. परंतु, वाटपपत्र देण्यापूर्वी ते सादर करणे अनिवार्य असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर १०० किंवा ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र सादर करण्याची अटही वगळली आहे. त्याऐवजी अर्जदारांना कोऱ्या कागदावर स्वसाक्षांकित शपथपत्र/वचनपत्र सादर करता येणार आहे.