नवी मुंबई : सिडकोने कारवाई करून अतिक्रमणमुक्त केलेल्या भूखंडांच्या विक्रीसाठी मागविण्यात आलेल्या निविदा गुरुवारी उघडण्यात आल्या. या सहा भूखंडांपैकी घणसोली सेक्टर ८ येथील भूखंडाला प्रति चौरस मीटर दोन लाख ७७ हजार रुपयांचा विक्रमी दर मिळाला. हा भूखंड ४,१५० चौरस मीटर क्षेत्रफळाचा असून, निवासी तथा वाणिज्यिक वापरासह मल्टिप्लेक्ससाठी तो आरक्षित करण्यात आला होता. दरम्यान, या सहा भूखंडांच्या विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत २४५ कोटी रुपयांची भर पडली आहे.
सिडकोच्या मोठ्या भूखंडांवर प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. विशेष म्हणजे, कारवाई झाल्यानंतर पुन्हा अतिक्रमण उभारले जात असल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले. त्यामुळे सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी अतिक्रमणमुक्त भूखंड निविदा काढून विक्री करण्याचे सर्वाधिकार अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाला दिले होते. त्यानुसार या विभागाने अतिक्रमणमुक्त झालेल्या भूखंडाच्या विक्रीचा सपाटा लावला आहे.
या विभागाच्या मार्फत आतापर्यंत अशा भूखंडांच्या विक्रीसाठी दोन वेळा निविदा मागविण्यात आल्या होत्या. यात विविध नोडमधील अतिक्रमणमुक्त करण्यात आलेल्या भूखंडांचा समावेश होता. या भूखंड विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत सुमारे साडेपाचशे कोटींची भर पडली आहे.
त्यानंतर अनधिकृत बांधकाम विभागाने घणसोली, कोपरखैरणे व सीबीडी-बेलापूर येथील विविध क्षेत्रफळाच्या सहा भूखंडासाठी निविदा मागविल्या होत्या, त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्राप्त झालेल्या निविदा गुरुवारी उघडण्यात आल्या. त्यानुसार घणसोली सेक्टर ८ येथील मल्टिप्लेक्ससह वाणिज्य आणि निवासी वापरासाठी आरक्षित असलेल्या ४१५० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाला पावणेतीन लाख रुपयांचा दर मिळाल्याची माहिती सिडकोच्या संबंधित विभागाने दिली आहे.आणखी निविदा काढणारअनधिकृत बांधकाम विभागाने भूखंड विक्रीसाठी आतापर्यंत तीन वेगवेगळ्या निविदा काढल्या. याद्वारे सिडकोला सुमारे ८०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. दरम्यान, येत्या काळात आणखी काही भूखंडांसाठी निविदा काढण्यात येणार असल्याचे सिडकोच्या संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे.