सिडकोला सातशे कोटींचा महसूल
By Admin | Published: September 25, 2016 04:17 AM2016-09-25T04:17:03+5:302016-09-25T04:17:03+5:30
सिडकोने आपल्या ताब्यातील मोकळ्या भूखंडांच्या विक्रीचा सपाटा लावला आहे. विशेष म्हणजे रियल इस्टेट क्षेत्रात मंदीचे सावट असतानाही या मोकळ्या भूखंडांना विक्रमी दर
- कमलाकर कांबळे, नवी मुंबई
सिडकोने आपल्या ताब्यातील मोकळ्या भूखंडांच्या विक्रीचा सपाटा लावला आहे. विशेष म्हणजे रियल इस्टेट क्षेत्रात मंदीचे सावट असतानाही या मोकळ्या भूखंडांना विक्रमी दर मिळत आहेत. मागील पंधरा दिवसांत सिडकोने घणसोली, कोपरखैरणे व सानपाडा परिसरातील आठ भूखंड विक्रीला काढले होते. या भूखंडांच्या विक्रीतून सिडकोला तब्बल ७00 कोटी रूपयांचा महसूल मिळाला आहे. विशेष म्हणजे सानपाडा येथील एका भूखंडाला प्रति चौरस मीटर चक्क ३,३३,३३३ दर मिळाला आहे.
पंधरा दिवसांपूर्वी सिडकोने घणसोली परिसरातील चार भूखंडांच्या निविदा काढल्या होत्या. त्याला विक्रमी दर प्राप्त झाले होते. या चार भूखंडांच्या विक्रीतून सिडकोला ३00 कोटी रूपयांचा महसूल प्राप्त झाला होता. त्यानंतर सिडकोने गुरूवारी सानपाडा, वाशी व कोपरखैरणे परिसरातील चार भूखंडांच्या निविदा उघडण्यात आल्या. यात सानपाडा येथील निवासी व व्यवसायिक वापारासाठी असलेला सेक्टर १७ येथील ७४३0 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाला प्रति चौरस मीटर ३,३३,३३३ रूपये इतका दर प्राप्त झाला. तर वाशी सेक्टर १८ येथील ७५00 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड प्रति चौरस मीटर १,३३,३३३ रूपये दराने विकला गेला. त्यापाठोपाठ कोपरखैरणे सेक्टर ४ ए व सेक्टर ८ येथील दोन भूखंडांना अनुक्रमे १,४१,७७७ आणि १,८९,१८९ रूपये प्रति चौरस मीटरचा दर प्राप्त झाला. या चारही भूखंडांच्या विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत ३९१ कोटी रूपयांची भर पडली आहे.
याअगोदर म्हणजेच पंधरा दिवसांपूर्वी सिडकोने घणसोली सेक्टर १२ येथील सुमारे चार हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे चार भूखंडासाठी निविदा मागविल्या होत्या. या चारपैकी १0,0४१ चौरसी मीटर क्षेत्रफळाचा भूखंड हा निवासी व वाणिज्य वापरासाठी होता. या भूखंडाची सिडकोची प्रति चौरस मीटरची पायाभूत किमत ४३,४५0 रूपये इतकी होती. त्यासाठी प्रति चौरस मीटर १ लाख ४१ हजार रूपयांची सर्वोच दर मिळाला होता. तर निवासी वापरासाठी असलेल्या तीन भूखंडांना प्रति चौरस मीटरला सरासरी ६0 हजार रूपयांचा दर मिळाला होता. या चार भूखंडांच्या विक्रीतून सिडकोला तब्बल ३00 कोटी रूपयांचा महसूल प्राप्त झाला होता. तर दोन महिन्यापूर्वी सिडकोने नेरूळ व सानपाडा येथील वेगवेगळ्या क्षेत्रफळाच्या चार भूखंडांच्या विक्रीसाठी निविदा मागविल्या होत्या. त्याला तब्बल ५७ विकासकांनी प्रतिसाद दिला. या चार भूखंडांच्या विक्रीतून सिडकोला ४३९ कोटी रूपयांचा महसूल प्राप्त झाला होता. यावरून गेल्या अडीच महिन्यात सिडकोने केवळ भूखंड विक्रीतून तब्बल १000 कोटी रूपयांची कमाई केली आहे.
भूखंडांच्या ट्रेडिंंगला गती
शहरातील जमिनीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे बांधकाम उद्योगाला घरघर लागली आहे. शहराच्या विविध भागात सुमारे वीस हजार मालमत्ता विक्रीअभावी पडून असल्याचे बोलले जाते. ही वस्तुस्थिती असताना सिडकोने बोली पध्दतीने भूखंड विक्रीवर भर दिला आहे. त्यामुळे विकास प्रकल्पांना खीळ बसून भूखंडांच्या ट्रेडिंगला गती मिळण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. ही परिस्थिती बजेटमधील गृहनिर्माण धोरणाला मारक ठरणारी आहे. कारण अनेक विकासक क्षमता नसतानाही अव्वाच्या सव्वा बोली लावून भूखंड पदरात पाडून घेतात. सिडकोचे पुर्ण पैसे भरण्याअगोदरच त्या भूखंडांचे ट्रेडिंग सुरू केले जाते. भूखंडांच्या अवाजवी किमतीमुळे अनेकांचे ट्रेडिंग फसते. असे विकासक आणि गुंतवणुकदारांसमोर सदर भूखंड सिडकोला सरेंडर करण्याशिवाय पर्याय नसतो. यापूर्वी अशाप्रकारे अनेक भूखंड सिडकोला परत करण्यात आले आहेत.
3,33,333
आकड्याचे गौडबंगाल?
सिडकोने तीन महिन्यापूर्वी सानपाडा सेक्टर १३ येथील ३0५0 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडासाठी निविदा मागविल्या होत्या. या भूखंडाला प्रति चौरस मीटरला ३,३३,३३३ रूपयांचा दर प्राप्त झाला होता. गुरूवारी सानपाडा सेक्टर १७ येथील ७४३0 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडासाठी निविदा उघडण्यात आल्या. या भूखंडाला मिळालेला प्रति चौरस मीटर सर्वोच्च दर ३,३३,३३३ रूपये इतका आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही भूखंड मे. भूमीराज इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीला मिळाले आहेत. या दोन्ही निविदा प्रक्रियेत भूमीराज इन्फ्रास्ट्रक्चरने कोट केलेल्या दराचा आकडा सारखाच असल्याने हे काय गौडबंगाल आहे, याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत.