सिडको म्हणतेय, निवडा आवडीचे घर!, चार वर्षांत ८७ हजार घरांची निर्मिती केली जाणार
By कमलाकर कांबळे | Published: May 11, 2023 04:58 AM2023-05-11T04:58:24+5:302023-05-11T04:58:38+5:30
सिडकोच्या माध्यमातून चार वर्षांत ८७ हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे.
कमलाकर कांबळे
नवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून चार वर्षांत ८७ हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. त्यापैकी चालू वर्षात जवळपास ४१ हजार घरे बांधण्याचा निर्धार सिडकोने केला आहे. विशेष म्हणजे ही सर्व घरे ‘निवडा तुमच्या आवडीचे घर’ या संकल्पनेंतर्गत ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर विकण्याचा निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी घेतला आहे.
सिडकोने मागील पाच वर्षांत विविध घटकांसाठी जवळपास २५ हजार घरांची निर्मिती केली आहे, तर पुढील चार वर्षांत चार टप्प्यात ८७ हजार घरे बांधण्याचे नियोजन केले आहे.
यातील बहुतांशी घरे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठीची आहेत. नियोजित एकूण घरांपैकी चालू वर्षात ४१ हजार घरे बांधली जाणार आहेत.
काय आहे नवीन धोरण?
बुक माय सिडको होम या तत्त्वानुसार सर्व घरे आरक्षण प्रवर्गानुसार सिडकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहेत. यात घराचे क्षेत्रफळ, नकाशा, मजला, आरक्षण तसेच घराची किंमत आदीचा इत्यंभूत तपशील असणार आहे.
गृहविक्रीच्या जुन्या धोरणातील त्रुटी
सिडकोच्या माध्यमातून विविध घटकांसाठी आतापर्यंत जवळपास दीड लाख घरांची निर्मिती केली आहे. घरांच्या नोंदणीसाठी यापूर्वी अर्जदारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याची पद्धत कार्यरत होती.
यात अनेक त्रुटी असल्याने गरजूंना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता. पाच वर्षांत सिडकोने काढलेल्या विविध योजनांतून हेच स्पष्ट झाले आहे. परिणामी, विविध ग्रुप प्रकल्पातील सहा ते सात हजार घरे विक्रीविना पडून आहेत. त्यामुळे सिडकोचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
ही बाब लक्षात घेऊन मुखर्जी यांनी गृह विक्रीचे नवीन धोरण अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गरजूंना त्यांच्या पसंतीनुसार व आर्थिक क्षमतेनुसार घर घेण्याचे स्वातंत्र्य प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रस्तावित ४१ हजार घरांपैकी सर्वाधिक म्हणजेच जवळपास २१ हजार घरे फक्त तळोजा नोडमध्ये आहेत. मेट्रो आणि दळणवळणाच्या इतर सुविधांसह प्रस्तावित दर्जेदार पायाभूत सुविधांमुळे खारघरलगत असलेल्या तळोजा नोडला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे.
सिडकोच्या माध्यमातून या नोडमध्ये पायाभूत सुविधांवर जवळपास १७ हजार कोटींची कामे सुरू आहेत. विस्तीर्ण रस्ते, पदपथ, क्रीडांगणे आदींसह पाणीपुरवठ्यावर विशेष भर दिला जात आहे. येत्या काळात या विभागातील घरांना अधिक पसंती मिळेल, असे सिडकोला वाटते.