नवी मुंबई : सिडकोने येत्या काळात गृहबांधणीवर आपले अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार येत्या काळात विविध घटकांसाठी ९० हजार घरे बांधण्याचे सिडकोने प्रस्तावित केले आहे. या घरांचे मार्केटिंग, विक्री आणि इतर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सिडको नवीन संस्थेच्या शोधात आहे. त्यासाठी इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सध्या प्रॉबिटी सॉफ्ट या संस्थेच्या माध्यमातून मर्यादित स्वरूपात ही कामे केली जात आहेत.केंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेअंतर्गत आगामी काळात २ लाख १५ हजार घरे बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यापैकी ९० हजार घरांचा आराखडा तयार करण्यात आला असून बांधकामासाठी कंत्राटदारही नेमले आहेत. या घरांच्या मार्केटिंग व विक्रीसाठी सिडकोने पहिल्यांदाच बाह्य संस्थेची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी २0१८ मध्ये काढलेल्या १५ हजार घरांच्या सोडत प्रक्रियेसाठी सिडकोने प्रॉबिटी सॉफ्ट या खासगी संस्थेची नियुक्ती केली होती. सुरुवातील या संस्थेवर मर्यादित स्वरूपाची जबाबदारी टाकली होती. परंतु टप्प्याटप्प्याने गृहप्रकल्पांशी संबंधित अर्जांची पडताळणी, स्कॅनिंग, मनुष्यबळ पुरवठा व इतर अत्यावश्यक कामेसुद्धा याच संस्थेकडे दिली. या प्रक्रियेत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप त्या वेळी करण्यात आला होता.प्रॉबिटी सॉफ्ट या संस्थेने दिलेले मनुष्यबळ पुरवठा आणि इतर सब कॉन्ट्रॅक्टसुद्धा वादात सापडले आहे. काही अधिकाऱ्यांनी परस्पर संगनमताने मर्जीतील लोकांना हे सबकॉन्ट्रॅक्ट मिळवून दिल्याचा आरोप होत आहे. या संस्थेच्या कामकाजाविषयीसुद्धा अर्जदारांत नाराजी आहे. मागील दोन वर्षांत सिडकोने जवळपास २५ हजार घरांसाठी सोडत काढली आहे. यात पात्र ठरलेल्या ग्राहकांना विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सिडकोच्या खेटा माराव्या लागत आहेत. सिडकोकडून त्यांना संबंधित संस्थेकडे पाठविले जाते. या संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून समानधानकारक उत्तरे मिळत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या नोडमध्ये विविध घटकांसाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ९० हजार घरांच्या प्रकल्पात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. त्यानुसार या घरांचा प्रचार व प्रसार, मार्केटिंग तसेच विक्री या सर्व प्रक्रियांसाठी एक नवीन संस्था नियुक्त करण्याची योजना सिडकोने आखली आहे. ग्राहकांच्या अडचणी व तक्रारींना लागणार कात्रीदोन वर्षांत २५ हजार घरांपैकी सहा ते सात हजार घरे विक्रीविना पडून आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी ही बाब गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळे दुरावत चाललेल्या ग्राहकवर्गाला आकर्षित करण्यासाठी सिडकोने विविध योजना आखल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रस्तावित ९० हजार घरांच्या माध्यमातून ग्राहकांच्या तक्रारींना कात्री लावण्याचा सकारात्मक प्रयत्न केला जात आहे.
घरांचे मार्केटिंग करण्यासाठी सिडको नवीन संस्थेच्या शोधात, इच्छुकांकडून मागविले प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 12:24 AM