नवी मुंबई : सिडकोच्या मोकळ्या भूखंडांवर विविध प्रकारे अतिक्रमण सुरूच आहे. बेकायदा बांधकामांसह अनधिकृत व्यवसाय करण्यासाठी सुध्दा या मोकळ्या भूखंडांचा सर्रास वापर केला जात आहे. एका व्यावसायिकाने पामबीच मार्गावर कोपरी येथे जुन्या कार विक्रीचा व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. यासंदर्भात माहिती कार्यकर्ते विकास पाटील यांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.पामबीच मार्गावर कोपरी येथील जुन्या वाहनांचा कार बाजार सर्वश्रुत आहे. या कार बाजारामुळे अनेकदा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे यापूर्वी महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून अनेकदा कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पदपथावर विस्तारलेल्या या कार बाजाराला काही प्रमाणात प्रतिबंध बसला आहे. असे असले तरी काही व्यावसायिकांनी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या सिडकोच्या मोकळ्या जागेवर आपली कार्यालये थाटून विक्रीसाठी जुन्या वाहनांचे प्रदर्शन मांडले आहे. सेक्टर २८ येथील प्लॉट क्रमांक २0५ वर मातोश्री एन्टरप्रायजेस नावाचे कार्यालय आहे. हे कार्यालय अनधिकृत असून त्यामाध्यमातून जुन्या कार विक्रीचा व्यवसाय चालतो.विशेष म्हणजे अगदी दर्शनी भागात इतके मोठे अतिक्रमण करूनसुध्दा सिडकोच्या संबंधित विभागाकडून त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विकास पाटील यांनी केला आहे. यापूर्वी विकास पाटील यांनी वाहतूक विभागाकडे रीतसर तक्रार केली होती. परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे त्यांनी महापालिका आणि सिडकोकडे लेखी तक्रार केली आहे. अतिक्रमण आणखी वाढण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला असलेला हा भूखंड सिडकोने ताब्यात घ्यावा, अशी मागणी त्यांनी संबंधित प्रशासनाकडे केली आहे. (प्रतिनिधी)
सिडकोच्या जागेवर कार बाजार
By admin | Published: September 08, 2016 3:18 AM