नागरिकांच्या असंतोषामुळे सिडकोने कारवाई थांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2016 02:24 AM2016-05-12T02:24:58+5:302016-05-12T02:24:58+5:30
सिडको व पोलिसांनी अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी रोड मॅप तयार केला आहे. परंतु मंगळवारी पोलिसांना पूर्वसूचना न देताच वडघरमधील तीन चाळींवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला
नवी मुंबई : सिडको व पोलिसांनी अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी रोड मॅप तयार केला आहे. परंतु मंगळवारी पोलिसांना पूर्वसूचना न देताच वडघरमधील तीन चाळींवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. रहिवाशांनी रोडवर उतरून तीव्र विरोध केल्यामुळे सिडकोला ही कारवाई थांबवावी लागली.
पनवेल तालुक्यामधील सिडकोच्या जमिनीवर मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकाम झाले आहे. काही ठिकाणी वीटभट्ट्या व काही ठिकाणी चाळींसह बहुमजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. विमानतळ परिसरामध्येही अतिक्रमण वाढले आहे. या परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होवू लागला आहे. यामुळे पोलिसांनी कारवाईविषयी रोडमॅप तयार केला आहे. सिडकोने कारवाईपूर्वी किमान चार दिवस पोलिसांना बंदोबस्तासाठी माहिती दिली पाहिजे. यानंतर पोलीस व सिडकोचे अधिकारी घटनास्थळी जावून पाहणी करतील. ज्यांचे अतिक्रमण आहे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनी जागा मोकळी करून देण्याचे आवाहन करतील. त्यानंतरही संबंधितांनी योग्य सहकार्य केले नाही तर बंदोबस्तामध्ये अनधिकृत बांधकाम पाडण्यात येईल. पोलीस गरज पडल्यास जादा कर्मचारीही उपलब्ध करून देतील, असे परिमंडळ एकचे उपआयुक्त विश्वास पांढरे यांनी सिडको अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
अनधिकृत कारवाईविषयी बंदोबस्ताचा रोड मॅप ठरलेला असतानाही सिडकोने १० मे रोजी त्याचे उल्लंघन केले. पोलिसांना वडघर परिसरातील वीटभट्ट्यांवर कारवाई करण्यासाठी बंदोबस्ताची मागणी केली होती. येथील ८ वीटभट्ट्या, हॉटेल,सिमेंट आर्र्टिकल फॅक्टरीसह कार्यालय पाडण्यात आले. यानंतर अतिक्रमण विभागाला जवळच तीन चाळी निदर्शनास आल्या. या चाळीही पाडण्याचा निर्णय तत्काळ घेण्यात आला. पोलिसांना व ज्यांच्यावर कारवाई करणार त्यांनाही याची माहिती दिली नव्हती. कारवाई सुरू करताच परिसरातील ३०० पेक्षा जास्त नागरिक रस्त्यावर उतरून त्यांनी सिडकोच्या पथकास विरोध केला. माजी खासदार रामशेठ ठाकूर व इतर पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून सिडकोच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांना माहिती दिली. राधा यांनी परिस्थिती हाताळण्यासाठी उपआयुक्तांना पाचारण केले. उपआयुक्तांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. परंतु सदर चाळीवरील कारवाई तत्काळ स्थगित करण्यात आली.