- नामदेव मोरेनवी मुंबई : सर्व शासकीय कार्यालयांचे कामकाज मराठीमधूनच झाले पाहिजे, असा नियम आहे; परंतु राज्यातील सर्वात श्रीमंत महामंडळ असलेल्या सिडकोकडूनइंग्रजीलाच अधिक पसंती दिली जात आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळालाच इंग्रजीमधून उत्तर देण्यात आले आहे. संचालक मंडळाच्या ठरावासह संकेतस्थळावर इंग्रजीमधील मजकुराला जास्त प्राधान्य देण्यात आले आहे. सिडकोने कामकाजासाठी मराठीला प्राधान्य न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.नेरुळ सेक्टर ४६, ४८ परिसरामध्ये सिडकोने बांधलेल्या इमारतींमधील छत कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. १६ आॅगस्टला छताचा काही भाग कोसळून दोन महिला जखमी झाल्या होत्या. जुन्या इमारतींची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी मनसेचे नितीन चव्हाण, आरती धुमाळ, श्रीकांत माने, सचिन कदम यांच्या सहीने निवेदन सिडको व्यवस्थापनास देण्यात आले. सिडकोच्या मुख्य अभियंता के. के. वरखेडकर यांनी तत्काळ मनसेच्या शिष्ठमंडळाला लेखी उत्तर दिले. कार्यकारी अभियंता एम. के. महाले यांना, घटनास्थळी भेट देऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, असे लेखी उत्तर दिले आहे; पण मराठीसाठी आग्रही असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला इंग्रजीमधून पत्र देण्यात आले आहे.वास्तविक महाराष्ट्रातील सर्व सरकारी अस्थापनांचे कामकाज मराठीमधून होणे आवश्यक आहे. मराठीसाठी मनसेने राज्यभर आंदोलन केले आहे. त्याच मनसेच्या हातामध्ये इंग्रजीमधून पत्र देण्यात आले. मराठी टाइप करणारा कर्मचारी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले होते. सिडको महामंडळाच्या या कार्यपद्धतीविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सिडकोला पहिल्यापासून मराठीचे वावडे आहे. महामंडळाच्या संकेतस्थळावरही मराठीपेक्षा इंग्रजी मजकूर जास्त देण्यात आला आहे. सिडकोच्या संचालक मंडळाचे ठरावही इंग्रजीमधून असतात. संकेतस्थळावर दिलेला तपशीलही इंग्रजीमध्येच आहे. अर्थसंकल्पासह अनेक महत्त्वाची माहिती इंग्रजीमधून देण्यात आली आहे.इंग्रजी भाषेच्या वापराला सिडकोकडून जास्त प्राधान्य दिले जात असल्याबद्दल यापूर्वीही नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा सिडकोचा सद्यस्थितीमधील सर्वात महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाविषयी परवानग्या, पर्यावरण अहवाल संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे; पण बहुतांश अहवाल इंग्रजीमधून असल्याने नागरिकांना ते वाचता व समजून घेता येत नाहीत. वास्तविक इंग्रजीमधून जेवढी माहिती आहे तेवढीच व त्याहीपेक्षा जास्त तपशील मराठीमधून असला पाहिजे; परंतु सिडको प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. यापूर्वीच्या संचालक मंडळावर असलेल्या राजकीय प्रतिनिधींनी विषयपत्रिका व इतिवृत्त मराठीमधून असले पाहिजे, याविषयी आग्रह धरला होता; परंतु सद्यस्थितीमध्ये पूर्णपणे प्रशासकीय संचालक मंडळ असून, संकेतस्थळावर इंग्रजीमधून मजकूर असून यामध्ये बदल न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
राज्यातील सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांमधील कामकाज मराठीमधूनच झाले पाहिजे. सिडकोचा इंग्रजीकडे कल असल्याचे निदर्शनास आले आहे. पत्रव्यवहार व संकेतस्थळावरील सर्व महत्त्वाची माहिती, अर्थसंकल्प, अहवाल मराठीमधूनच असले पाहिजेत. यामध्ये सुधारणा न झाल्यास मनसे स्टाइल आंदोलन केले जाईल.- गजानन काळे,शहराध्यक्ष, मनसेनागरिकांचीही गैरसोयसिडकोच्या संकेतस्थळावर विमानतळ, अर्थसंकल्प व इतर महत्त्वाची माहिती मराठीमधून कमी व इंग्रजीमधून जास्त आहे. संकेतस्थळाला आतापर्यंत तीन लाख ४२ हजार नागरिकांनी भेट दिली आहे. रोज शेकडो नागरिक संकेतस्थळ पाहत असतात; पण अनेक प्रकारची महत्त्वाची माहिती इंग्रजीमधून असल्यामुळे नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.