नवी मुंबई : डेब्रिजमाफीयांवर सिडकोची मध्यरात्री धडक, दहा डंपर जप्त
By सूर्यकांत वाघमारे | Published: March 31, 2023 04:15 PM2023-03-31T16:15:13+5:302023-03-31T16:15:30+5:30
उलवे परिसरात पथकाने केली कारवाई
नवी मुंबई : उलवे परिसरातील सिडको क्षेत्रात डेबीज टाकणाऱ्यांवर सिडकोच्या दक्षता पथकाने एनआरआय पोलिसांच्या मदतीने कारवाई केली आहे. यामध्ये दहा डंपर ताब्यात घेण्यात आले असून चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून डेब्रिज माफियांची नावे समोर आली असून त्यांच्यावर कारवाई होईल का याकडे लक्ष लागले आहे.
उलवे परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यालगत, मोकळ्या भूखंडावर डेब्रिजचा भराव टाकला जात आहे. विविध ठिकाणावरून डंपरमध्ये आणलेले डेब्रिज बेधडकपणे त्याठिकाणी टाकले जात होते. यापूर्वी विमानतळ परिसरात देखील डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतरही रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकले जात होते. त्यांच्यावर कारवाईसाठी सिडकोच्या दक्षता विभागाचे प्रमुख सुरेश मेंगडे, पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली एनआरआय पोलिसठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद तोरडमल, सिडकोचे सहायक अभियंता भाग्येश चौधरी यांच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री वहाळ परिसरात सापळा रचला होता. यामध्ये त्याठिकाणी डेब्रिज टाकण्यासाठी आलेले दहा डंपर पथकाच्या हाती लागले.
विविध ठिकाणावरून आलेल्या या डंपरमध्ये रेबीट, माती व दगड यांचा समावेश होता. हे डंपर ताब्यात घेऊन त्यांच्या दहा चालकांविरोधात एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्यावरणाला घातक असलेले हे डेब्रिज मुबारक, शकील, माऊली, अमित खारकर व विकी दपोलकर यांच्या सांगण्यावरून त्याठिकाणी टाकले जात होते अशी कबुली चालकांनी दिली आहे. त्यामुळे या डेब्रिज माफियांवर काय कारवाई होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील काही महिन्यात सिडकोने ठिकठिकाणी डेब्रिज टाकणाऱ्या २३ वाहनांवर कारवाई केली आहे. याप्रकरणी आठ गुन्ह्यांमध्ये २७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. सिडको क्षेत्रासह नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी डेब्रिज टाकले जात आहे. सायन पनवेल मार्गाने असे शेकडो डंपर ये जा करताना दिसतात. त्यामुळे या डंपरमधून वाहिले जाणारे डेब्रिज नेमके जाते कुठे यावर सर्व प्रशासनाने एकत्रित पथकाद्वारे चौकशी केल्यास डेब्रिज माफियांचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.