नवी मुंबई :सिडकोचानाशिक शहरातील कार्यभार संपुष्टात आला आहे. त्यानुसार या क्षेत्रात भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनी फ्री होल्ड करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यापूर्वी औरंगाबाद येथील सिडकोच्या भाडेतत्त्वावरील जमिनी फ्री होल्ड करण्यात आल्या. औरंगाबादपाठोपाठ आता नाशिकमधील सिडकोचे अधिकार संपुष्टात येणार आहेत. त्यामुळे सिडकोच्या नाशिक कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सिडकोच्या नवी मुंबई कार्यालयात बदल्या केल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली.
नवी मुंबईतील बहुतांशी जमिनींची मालकी सिडकोकडे आहे. सिडकोने त्या भाड्डेपट्ट्याने अर्थात लीज होल्डवर दिल्या आहेत. त्यामुळे या लीज होल्डच्या जमिनी फ्री हाेल्ड कराव्यात, ही नवी मुंबईकरांची जुनी मागणी आहे. औरंगाबाद येथील जमिनी याअगोदरच फ्री होल्ड केल्या आहेत. पाठोपाठ आता सिडकोचे नाशिक येथील कार्यालय बंद करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत.
भाडेपट्ट्याची मुदत वाढविली नवी मुंबईतील जमिनीही फ्री हाेल्ड कराव्यात, अशी येथील रहिवाशांची जुनी मागणी आहे. त्यानुसार २०१९ मध्ये राज्य शासनाने नवी मुंबईतील जमिनीही फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेतला; परंतु तो म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचे नंतर स्पष्ट झाले. कारण फ्री होल्डच्या नावाखाली भाडेपट्ट्याची मुदत ६० वर्षांवरून ९९ वर्षे केली आहे. मुळात फ्री हाेल्ड म्हणजे सिडकोच्या बंधनातून मुक्त होणे अपेक्षित असताना राज्य शासनाने नवी मुंबईकरांची फसवणूक केल्याचा आरोप होत आहे.
नाशिक कार्यालयात राहणार अवघे चार कर्मचारी -सिडकोच्या विक्री न झालेल्या मालमत्ता आणि मोकळ्या भूखंडांची अभिलेखामध्ये नोंद करण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर असणार आहे. सिडकोचे नाशिक येथील कामकाज संपुष्टात आल्याने या भागातील सिडकोच्या लीज होल्डवरील जमिनी फ्री होल्ड केल्या जाणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सिडकोचे कार्यालय सुरू राहील, असे नगरविकासने सूचित केले.
सिडकोशी संबंधित काही कामेही प्रलंबित आहेत. ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक कर्मचारी कायम ठेवून उर्वरित कर्मचाऱ्यांची सिडकोच्या अन्य विभागात बदलीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आठ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नवी मुंबईत बदली केली आहे. नाशिक कार्यालयात चार कर्मचारी कायम ठेवले आहेत.