जलवाहतूक सुरू करण्यासाठी सिडकोने कसली कंबर
By कमलाकर कांबळे | Published: February 5, 2024 09:05 PM2024-02-05T21:05:44+5:302024-02-05T21:05:54+5:30
संचालन, देखभालीसाठी खासगी संस्थेचा शोध
नवी मुंबई : मेट्रो सेवा सुरू केल्यानंतर सिडकोने आता नेरूळ जेट्टी ते मुंबईदरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने हलचाली सुरू केल्या आहेत. खासगी संस्थेच्या माध्यमातून ही सेवा पुरविण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यासाठी इच्छुक संस्थेकडून प्रस्ताव मागविले आहेत. पुढील दोन महिन्यात ही सेवा सुरू करण्याची सिडकोची योजना असल्याची माहिती सूत्राने दिली.
मुंबई ते नवी मुंबईदरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी सिडकोने नेरूळ येथे सुमारे १११ कोटी रुपये खर्चून सुसज्ज जेट्टी बांधली आहे. परंतु, मागील दोन वर्षांपासून ही जेट्टी धूळखात पडली आहे. वापर नसल्याने तिच्या देखभालीवर सिडकोला लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत.
एप्रिल २०१८ मध्ये या जेट्टीच्या उभारणीला मंजुरी मिळाली होती.
विशेष म्हणजे हे काम दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, कोरोनाचा संसर्ग आणि इतर तांत्रिक अडचणीमुळे हे काम काही प्रमाणात रखडले होते. परंतु, सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी कोरोनाच्या प्रतिकूल काळातही सप्टेंबर २०२१ मध्ये या जेट्टीचे काम पूर्ण करून घेतले. तेव्हापासून विविध कारणांमुळे ही जेट्टी वापराविना पडून आहे. ही बाब लक्षात घेऊन सिडकोचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी दीर्घकाळ रखडलेली जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नेरूळ जेट्टीचे संचलन, देखभाल, पर्यटनासह पर्यटन सुविधा देण्यासाठी इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागविले आहेत. विशेष म्हणजे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी दीर्घकाळ रखडलेल्या मेट्रोचे लोकार्पण करून नवी मुंबईकरांना दिलासा दिला आहे. त्याच धर्तीवर पुढील दोन तीन महिन्यात नवी मुंबई ते मुंबईदरम्यान नेरूळ जेट्टीवरून जलवाहतूक सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांनी कंबर कसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
बेलापूर जेट्टीवरून प्रवास महागडा
बेलापूर येथे मेरिटाईम बाेर्डाने जेट्टी बांधली आहे. १७ फेब्रुवारी २०२२ रोजी या जेट्टीवरून वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली. परंतु, त्याचे दर अव्वाच्या सव्वा असल्याने सर्वसामान्य प्रवाशांनी या सेवेकडे पाठ फिरविली आहे. या पार्श्वभूमीवर बेलापूर ते मुंबईदरम्यानचे तिकीट दर कमी करावेत, अशी मागणी विविध स्तरांतून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोने जलवाहतूक सेवा सुरू करताना तिकीट दर कमी ठेवावेत, अशी मागणी आतापासूनच नवी मुंबईकरांकडून केली जात आहे.