नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्राच्या (नैना) विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने सिडकोने या क्षेत्रात रस्त्यांचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तब्बल ३,११४ कोटी रुपये खर्चाच्या कामाचे प्रस्ताव मागविले आहेत. विशेष म्हणजे, ही कामे सहा टप्प्यांत पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे बंधन या प्रक्रियेत पात्र ठरणाऱ्या ठेकेदारांवर असणार आहे.
नैना क्षेत्राच्या विकासाला झालेली दिरंगाई लक्षात घेऊन व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या प्रकल्पाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने या क्षेत्रात रस्त्यांसह इतर आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या नैनाचा पायलट प्रकल्प म्हणून उभारण्यात येत असलेल्या आणि २३ गावांचा समावेश असलेल्या पहिल्या टप्प्यातील विकासकामांना प्राधान्य दिले आहे. पहिल्या टप्प्यात १२ नगर रचना परियोजना (टीपीएस) प्रस्तावित आहेत. त्यापैकी टीपीएस क्रमांक २ ते ७ मध्ये प्रमुख आणि अंतर्गत रस्ते, मलनिस्सारण वाहिन्या, गटारे, पथदिवे आदींची कामे युद्धपातळीवर हाती घेण्याच्या सूचना सिंघल यांनी दिल्या आहेत.
- प्रस्तावित कामांचा तपशील
टीपीएस क्रमांक २ ते ७ मध्ये रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा प्रस्तावित केल्या आहेत. टीपीएस क्रमांक २ व ३ मध्ये २७ मीटर आणि २० मीटर रुंदीचा अंतर्गत रस्ता तसेच गटारे, नाले, पदपथ आदींसाठी १७८ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. तर टीपीएस क्रमांक ४, ५, ६ आणि ७ मध्ये २० मीटर, २७ मीटर आणि २७ मीटर रुंदीच्या रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधांसाठी ५२६ कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे टीपीएस क्रमांक २ ते ७ मध्ये ६० मीटर आणि ४५ मीटर रुंदीचा बाह्य रस्ता, त्यावरील लहान मोठे उड्डाणपूल, पथदिवे आणि इतर अत्यावश्यक सुविधांसाठी २,३८९ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
- ७ हजार ५०० कोटींचा भार
नैना क्षेत्राच्या विकासावर टप्प्या-टप्याने ७ हजार ५०० कोटी रुपये खर्च करण्याचे सिडकोचे नियोजन आहे. त्यासाठी प्रत्येक वर्षीच्या अंदाजपत्रकात विशेष आर्थिक तरतूद केली जात आहे. गेल्या वर्षी या विभागातील अंतर्गत रस्ते, मलवाहिन्या आणि पदपथांच्या कामासाठी सिडकोने १२०० कोटी रुपये खर्च केले आहेत. तर या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच ३,११४ कोटींची कामे प्रस्तावित केली आहेत.