नैना क्षेत्रात सिडको विणणार रस्त्यांचे जाळे; पायाभूत सुविधांच्या कामांवर ६४११ कोटी करणार खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 08:43 AM2024-07-24T08:43:01+5:302024-07-24T08:43:13+5:30
नैना क्षेत्राला झालेली दिरंगाई लक्षात घेऊन व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या प्रकल्पाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे.
- कमलाकर कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्राच्या (नैना) विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्यानुसार पायाभूत सुविधांच्या निर्मित्तीवर भर दिला जात आहे. काही महिन्यांपूर्वी ३,११४ कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा मागविल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेली ही प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. यातच आता रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामासाठी सुमारे ३३०० कोटींच्या खर्चाची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. एकूणच पुढील काही महिन्यांत नैना क्षेत्रात जवळपास ६४११ कोटींच्या पायाभूत सुविधांच्या कामांना सुरुवात होणार आहे.
नैना क्षेत्राला झालेली दिरंगाई लक्षात घेऊन व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या प्रकल्पाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने या क्षेत्रात रस्त्यांसह इतर आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. नैनाचा पायलट प्रकल्प आणि २३ गावांचा समावेश असलेल्या पहिल्या टप्प्यातील विकासकामांना प्राधान्य दिले आहे.
पहिल्या टप्प्यात १२ नगररचना परियोजना (टीपीएस) प्रस्तावित आहेत. त्यापैकी नगररचना परियोजना क्रमांक २,३.३.४.५.६ आणि ७ अंतर्गत प्रस्तावित असणाऱ्या रस्ते, पदपथ, पावसाळी पाण्याची गटारे आदी विकासकामांसाठी ३११४ कोटी इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकीय किमती एवढ्या निविदा मागविण्यात आल्या होत्या.
त्यांचे आर्थिक देकार नुकतेच उघडण्यात आले असून, लवकरच या विकासकामांना सुरुवात होईल, असा विश्वास संबंधित विभागाने व्यक्त केला आहे. त्यापाठोपाठ आता नगररचना परियोजना क्रमांक ८, ९, १०, ११ आणि १२ मध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ३३०० कोटींच्या खर्चाचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
७ हजार ५०० कोटींचा भार
नैना क्षेत्राच्या विकासावर टप्प्याटप्याने ७ हजार ५०० कोटी रुपये खर्च करण्याचे सिडकोचे नियोजन आहे. गेल्या वर्षी या विभागातील अंतर्गत रस्ते, मलवाहिन्या आणि पदपथांच्या कामासाठी सिडकोने १२०० कोटी रुपये खर्च केले आहेत, तर या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच ३,११४ कोटींची कामे प्रस्तावित केली आहेत तर आता ३३०० कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव मागविले आहेत.
भूधारकांना सिडकोचे आवाहन
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नैना क्षेत्राला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. तेथील जागांच्या किमती वाढणार आहेत. त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक प्रगती होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन या क्षेत्रात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्याची सिडकोची योजना आहे. सुविधा उपलब्ध झाल्यास विकासाला गती मिळेल. त्याच भूमिकेतून सिडकोने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भूधारकांसह विकासक आणि गुंतवणूकदारांनी सहकार्याची भूमिका ठेवावी, असे आवाहन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले आहे.