नारायण जाधव, लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : नेरूळ येथील डीपीएस तलावात भरतीचे पाणी येणारे सिडकोने बुजविलेले चोक पाॅइंट नवी मुंबई महापालिकेेने आमदार गणेश नाईक यांच्या आंदोलनानंतर तोडल्यानंतर सिडकोने पंधरा दिवसांनंतर नवी मुंबई महापालिकेसह ते काम करणारे ठेकेदार मे. भारत उद्योग यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार करून उचित कारवाईची मागणी केली आहे. सिडकोच्या या कृत्यावर पर्यावरणप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. असे करून डीपीएस तलावाचे क्षेत्र कोरडे करून त्याचे क्षेत्र विकण्याचा सिडकोचा घाट असल्याचा गंभीर आरोप करून नॅट कनेक्ट संस्थेने याबाबत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.
सिडकोच्या या पर्यावरणविरोधी वृत्तीबद्दल नाराजी व्यक्त करून कुमार यांनी डीपीएस फ्लेमिंगो तलाव तत्काळ नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांना केले आहे. सिडको आणि मनपा हे दोन्ही राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या अंतर्गत येत असून, त्याचा कारभार स्वत: मुख्यमंत्री पाहत आहेत; परंतु दुर्दैवाने सिडकोला तलावाचे क्षेत्र कोरडे करून त्याचे व्यावसायिकीकरण करायचे आहे, असे नवी मुंबई एन्व्हायर्नमेंटल प्रिझर्व्हेशन सोसायटीचे संदीप सरीन यांनी सांगितले. याबाबत कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, जेट्टीचे काम सुरू करताना सिडकोने पाण्याच्या मुक्त प्रवाहात व्यत्यय आणणार नाही, असे स्वतः पर्यावरण मंत्रालयाला दिलेल्या हमीपत्राचे उल्लंघन केले आहे.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने नेरूळ येथील जेट्टीसाठी खारफुटीचे ४६ हेक्टर वळविण्याची परवानगी देताना, पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होऊ नये, अशी अट घातली होती, याची आठवण कुमार यांनी करून दिली आहे. राज्याच्या वन विभागाच्या एका सरकारी आदेशानेही ही अट घातली आहे.
गणेश नाईकांच्या भूमिकेकडे लक्ष
सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथॉलॉजी अँड नॅचरल हिस्ट्रीच्या अभ्यासानुसार ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यामधील प्रजातींवर परिणाम होऊ नये, असे केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथॉलॉजी अँड नॅचरल हिस्ट्रीच्या अभ्यासात असे निदर्शनास आले आहे की, ठाणे खाडीमधून फ्लेमिंगो समुद्राच्या भरतीच्या वेळी जवळच्या पाणथळ प्रदेशात उतरतात. याबाबत कुमार यांनी उच्च न्यायालयाने नेमलेल्या खारफुटी समितीकडेही तक्रार केल्यावर खारफुटी समितीच्या पथकाने नुकतीच डीपीएस तलावास भेट देऊन सिडकोने केलेल्या पर्यावरण अटींच्या उल्लंघनाची पुष्टी केली आहे. ही पार्श्वभूमी असतानाही नवी मुंबई महापालिकेविरोधात सिडकोने पोलिसांत तक्रार केल्याने संताप व्यक्त होत आहे. याबाबत आता आमदार गणेश नाईक काय भूमिका घेतात, याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.