सिडकोच्या दक्षता सप्ताह कार्यक्र मावर कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:36 AM2018-10-30T00:36:20+5:302018-10-30T00:36:43+5:30
सिडकोच्या दक्षता विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दक्षता जनजागृती सप्ताहावर सिडको एम्प्लॉईज युनियनसह अन्य संघटनांनी बहिष्कार टाकला.
नवी मुंबई : सिडकोच्या दक्षता विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दक्षता जनजागृती सप्ताहावर सिडको एम्प्लॉईज युनियनसह अन्य संघटनांनी बहिष्कार टाकला. सोमवारी दक्षता सप्ताहानिमित्त शपथग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गैरहजर राहून कर्मचारी संघटनांनी आपला निषेध नोंदविला. त्यामुळे दक्षता विभागाच्या कामकाजावर अधिकारी व कर्मचारी नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय सतर्कता आयोग आणि राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने देशभरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये २९ आॅक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान दक्षता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. सिडकोच्या दक्षता विभागाच्या अधिपत्याखाली आजपासून दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरूवात झाली. सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत अधिकारी व कर्मचाºयांना शपथ देण्यात आली. परंतु या कार्यक्रमाकडे कामगार संघटनांनी पाठ फिरविली. सिडकोच्या दक्षता विभागातील अधिकाºयांकडून कर्मचाºयांना सापत्नपणाची वागणूक दिली जात असल्याचा कामगारांचा आरोप आहे. एखाद्या फाईलमधील एक पेपर गहाळ झाला तरी दक्षता विभागामार्फत फाईल हाताळणाºया सर्वच स्तरावरील अधिकारी व कर्मचाºयांची चौकशी केली जात आहे. एकूणच विविध प्रकारे दक्षता विभागाकडून कर्मचाºयांची छळवणूक केली जात असल्याचा संघटनेचा आरोप आहे. याच कारणास्तव सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या दक्षता जनजागृती सप्ताहच्या शपथग्रहण सोहळ्यावर सिडकोतील विविध कामगार संघटनांनी बहिष्कार टाकल्याचे बोलले जात आहे.