घणसोली-ऐरोलीतील पामबीच रस्ता मार्गी, सिडको उचलणार ५० टक्के खर्च
By कमलाकर कांबळे | Published: November 9, 2023 06:49 AM2023-11-09T06:49:47+5:302023-11-09T06:50:01+5:30
घणसोली सेक्टर १४ ते ऐरोली सेक्टर १० ए यादरम्यानच्या साधारण दोन किमी लांबीच्या मार्गासाठी यापूर्वी २५० कोटींचा खर्च निश्चित केला होता.
नवी मुंबई : घणसोली- ऐरोलीदरम्यानचा गेली ११ वर्षे रखडलेला पामबीच मार्ग लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पाच्या खर्चावरून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला असून सिडकोने ५० टक्के खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे. सिडको संचालक मंडळाच्या बुधवारच्या बैठकीत या संबंधीच्या ठरावाला मंजुरी मिळाल्याचे समजते.
घणसोली सेक्टर १४ ते ऐरोली सेक्टर १० ए यादरम्यानच्या साधारण दोन किमी लांबीच्या मार्गासाठी यापूर्वी २५० कोटींचा खर्च निश्चित केला होता. मात्र, या मार्गाची लांबी दीड किमीने वाढल्याने खर्चही वाढला. सध्याच्या अंदाजानुसार या प्रकल्पाचा खर्च ४२५ कोटी अपेक्षित आहे. यापैकी सिडकोने अर्धा खर्च उचलावा, यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू होते; परंतु, सिडकोने आधीच्या अंदाजानुसार फक्त १२५ कोटी देण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे महापालिकेसमोर आर्थिक पेच निर्माण झाला होता. आता सिडकोने प्रकल्पाचा पन्नास टक्के खर्च देण्याची तयारी दर्शविली आहे. यासंबंधीच्या ठरावालाही संचालक मंडळाने मान्यता दिल्याने घणसोली पामबीच मार्गाचा ऐरोलीपर्यंतचा विस्तार दृष्टिपथात आला आहे.
मुंबई, कल्याणचे
अंतर वाचणार
या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी नियंत्रण विभाग, वन- खारफुटी संवर्धन समिती, पर्यावरण तसेच इकोसेन्सेटिव्ह परवाना आदी आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. पालिकेने निविदासुद्धा काढल्या आहेत. या प्रस्तावित मार्गामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूककोंडीला काही प्रमाणात आळा बसेल.
हा मार्ग थेट ऐरोली-मुलुंड पुलाला जोडला जाणार आहे. त्यामुळे प्रगतिपथावर असलेल्या ऐरोली-कटाई मार्गाने पुढे कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड या ठिकाणी सहज जाता येणार आहे. नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठीही हा पामबीच मार्ग उपयुक्त ठरेल, असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे.
सिडकोने २००८-२००९ मध्ये घणसोली नोडसह अर्धवट अवस्थेतील पामबीच मार्गही महापालिकेकडे हस्तांतरित केला. तेव्हापासून हा प्रकल्प ‘जैसे थे’ आहे. आता या प्रकल्पाच्या उभारणीसाठी पालिकेने कंबर कसली आहे. सुधारित आराखड्यानुसार, या मार्गाची लांबी दीड किमीने वाढली आहे. त्यामुळे तो ३.४७ किमीचा झाला आहे.