कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : पालघर तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीतील आदिवासींसाठी घरे बांधण्याची कार्यवाही सिडकोने सुरू केली आहे. चौक-मानिवली या गावातील सुमारे पाच एकर जागेवर ही घरे प्रस्तावित केली आहेत. रायगड जिल्हाधिकाऱ्यांसह सिडकोच्या संबंधित विभागाने या जागेची पाहणी केली असून अंतिम आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान पुढील पावसाळ्यापूर्वी बेघर झालेल्या इर्शाळवाडीतील आदिवासींचे नवीन घरांत पुनर्वसन करण्याची योजना असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी स्पष्ट केले.
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर १९ जुलै रोजी दरड कोसळून भीषण आपत्ती ओढवली होती. इर्शाळवाडीत एकूण ४३ आदिवासी कुटुंबे राहत होती. त्यांची एकूण लोकसंख्या २२९ इतकी होती. त्यापैकी २७ जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे या दुर्घटनेत संपूर्ण गावाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. बेघर झालेल्या या आदिवासी कुटुंबांसाठी याच परिसरात सिडकोच्या माध्यमातून घरे बांधण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीपासून काहीच अंतरावर असलेल्या चौक मानिवली येथील शासकीय जागा या प्रकल्पासाठी निश्चित केली आहे. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांसमवेत नियोजित जागेची पाहणी केली. त्यानंतर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी सोमवारी रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्याशी चर्चा केली.
पुढील पावसाळ्यापूर्वी ४३ घरे
या जागेवर ४३ घरे बांधण्यात येणार आहेत. त्यानुसार आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पुढील पावसाळ्यापूर्वी या नवीन घरांत येथील आदिवासींचे पुनर्वसन करण्याची योजना असल्याचे डिग्गीकर यांनी लोकमतला सांगितले.