चार वर्षांत सिडको बांधणार २ लाख १0 हजार घरे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 12:22 AM2019-09-19T00:22:25+5:302019-09-19T00:22:31+5:30
सर्वसामान्यांसाठी ९५हजार घरांची घोषणा केल्यानंतर सिडकोने आता आणखी १ लाख १0 हजार घरे निर्माण करण्याचे जाहीर केले आहे.
नवी मुंबई : सर्वसामान्यांसाठी ९५हजार घरांची घोषणा केल्यानंतर सिडकोने आता आणखी १ लाख १0 हजार घरे निर्माण करण्याचे जाहीर केले आहे. गेल्या महिन्यात राज्य सरकारने या महागृहनिर्माण योजनेस मंजुरी दिली होती. त्यानंतर सिडकोच्या संचालक मंडळाने सुद्धा या महागृहनिर्मिती योजनेला मंजुरी दिली आहे. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या ९५ हजार घरांसह आता नव्याने मंजुरी मिळाली १ लाख १0 हजार अशी जवळपास २ लाख १0 हजार घरे पुढील चार वर्षांत टप्प्याटप्प्याने निर्माण केली जाणार आहेत.
परिवहन केंद्रीत विकास संकल्पनेवर सिडकोने सध्या ९५ हजार घरांचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी तब्बल १९ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील ९ हजार २४९ घरांच्या आॅनलाइन नोंदणीचा ११ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. ९५ हजार घरांपाठोपाठ आता यात १ लाख १0 हजार घरांची भर पडणार आहे. त्यामुळे पुढील चार वर्षांच्या काळात सर्वसामान्यांसाठी सिडकोच्या माध्यमातून जवळपास २ लाख १0 घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
नव्याने समावेश मंजूर करण्यात आलेली १ लाख १0 हजार घरे एमआयडीसी क्षेत्रातील पावणे, तुर्भे, बोनसरी, कुकशेत व शिरवणे येथील बंद पडलेल्या दगडखाणीच्या जागेवर बांधण्यात येणार आहेत. यात ६२ हजार ९७६ घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तर ४७ हजार ४0 घरे अल्प उत्पन्न घटकांसाठी असणार आहेत. सध्या सुरू करण्यात आलेल्या ९५ हजार घरांच्या गृहप्रकल्पात ५३,४९३ घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तर उर्वरित ३६,२८८ घरे अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. ही सर्व घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधणार आहेत.