सिडको काढणार ३,५०० घरांची सोडत? सर्वसामान्यांची वर्षभरापासूनची प्रतीक्षा संपणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 09:54 AM2023-12-27T09:54:19+5:302023-12-27T09:54:35+5:30
पुढील चार वर्षांत उर्वरित ६७ हजार घरे बांधण्याची सिडकोची योजना आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई :सिडकोच्या नवीन घरांची सोडत नवीन वर्षात निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे. २६ जानेवारीच्या मुहूर्तावर विविध नोडमधील साडेतीन हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय संबधित विभागाने घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे मागील वर्षभरापासूनची सर्वसामान्यांची प्रतीक्षा संपणार आहे. सिडकोच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ८७ हजार घरे बांधली जात आहेत. त्यापैकी २५ हजार घरे बांधून त्यांचे यशस्वीरीत्या वाटप केले आहे. पुढील चार वर्षांत उर्वरित ६७ हजार घरे बांधण्याची सिडकोची योजना आहे.
जवळपास साडेतीन हजार घरांची सोडत २६ जानेवारीला काढण्याची योजना संबंधित विभागाने तयार केल्याचे समजते. विशेष म्हणजे सिडकोने पंतप्रधान आवास योजनेतील घरांची शेवटची सोडत गेल्या दिवाळीमध्ये काढली होती. ही घरे खारकोपर आणि बामणडोंगरी रेल्वेस्थानक परिसरात आहेत.
घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय
खासगी विकासकांपेक्षा सिडकोच्या या प्रकल्पातील घरांच्या किमती अधिक असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर या घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. परंतु, मागील आठ महिन्यांपासून या प्रस्तावावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. परिणामी या योजनेतील यशस्वी अर्जदारांना घरांचे वाटपपत्र दिले गेलेले नाही. याच कारणास्तव मागील वर्षभरात सिडकोने घरांची नवीन योजना काढली नसल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी नवीन वर्षात साडेतीन हजार घरांची सोडत काढण्याच्या हालचाली सिडकोने सुरू केल्याची माहिती सूत्राने दिली.