महामार्गावरील सिग्नलची देखभाल सिडको करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 02:10 AM2019-08-14T02:10:03+5:302019-08-14T02:10:20+5:30
पनवेल-सायन महामार्गावरील कळंबोली ते खारघर दरम्यानच्या सर्व सिग्नलची देखभाल करण्यास सिडको तयार झाली आहे.
कळंबोली : पनवेल-सायन महामार्गावरील कळंबोली ते खारघर दरम्यानच्या सर्व सिग्नलची देखभाल करण्यास सिडको तयार झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हस्तांतराचा प्रस्ताव दिला होता. त्याप्रमाणे मंगळवारी कामोठे उड्डाणपुलाखालील सिडकोने खासगी एजन्सीमार्फत सिग्नल यंत्रणेची तपासणी केली.
पनवेल-सायन महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने सिग्नल यंत्रणा बसवली आहे; परंतु कामोठे उड्डाणपूल, तळोजा लिंक रोड, खारघर हिरानंदानी येथील यंत्रणा बंद अवस्थेत आहे. म्हणजे हे सिग्नल धूळखात पडून आहे. कामोठे लेफ्ट टर्नची एक मार्गिका तयार झाली आहे. त्यामुळे आता येथून मुंबईच्या दिशेने वाहने धावतात. त्याबरोबर मुंबईकडून येणारी वाहने पुलाखालून वसाहतीत जातात.
कामोठे वसाहतीतून कळंबोली किंवा पनवेलकडे जाण्यासाठीही येथून जावे लागते. त्यामुळे कामोठे प्रवेशद्वारावर जंक्शनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे येथे वाहनांची वर्दळ मोठी असते. लहान-मोठे अपघातही घडतात. येथे असलेले सिग्नल बंद असल्याने वाहतूक सुरळीत होत नाही. हे सिग्नल पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी भाजपचे युवानेते सचिन गायकवाड यांनी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ही यंत्रणा सिडकोकडे हस्तांतरित करण्याकरिता पत्र दिले.
याकरिता येणारा खर्च देण्यास तयार असल्याचेही त्या पत्रात म्हटले होते; परंतु सिडकोकड़ून याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जात नव्हती, त्यामुळे गायकवाड यांनी पुन्हा मुख्य अभियंता यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याला प्रतिसाद देत सिडकोने ही सेवा हस्तांतरित करून घेण्यास मान्यता दिली आहे.
त्यानुसार मंगळवारी सिडकोने रिलॅबल या खासगी एजन्सीच्या मार्फत कामोठे सिग्नलची तपासणी करण्यात आली. ही संस्था तपासणी अहवालासह खर्चाचा तपशील सिडकोच्या विद्युत आणि मेट्रो विभागाला सादर करणार असल्याचे समजते.