सिडकोत महत्त्वाचा ‘खांदेपालट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 11:15 PM2019-02-24T23:15:20+5:302019-02-24T23:15:29+5:30
कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम : एकाच अधिकाºयावर विविध विभागाचा कार्यभार
- कमलाकर कांबळे
नवी मुंबई : सिडको व्यवस्थापनाने आपल्या विविध विभागांत लक्षणीय खांदेपालट केली आहे. आयएएस पदावर बढती मिळालेले अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी एस. एस. पाटील यांची सिडकोचे तिसरे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यावर पणन, वसाहत आणि अनधिकृत बांधकाम विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर विद्यमान दोन सह व्यवस्थापकीय संचालकांचा भार कमी करण्यात आला आहे. अचानक करण्यात आलेल्या या खांदेपालटामुळे सिडको वर्तुळात तर्क-वितर्क लढविले जात आहेत.
राज्यातील सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून सिडकोची ओळख आहे. सिडकोच्या माध्यमातून सध्या आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रोस विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारले जात आहेत. रायगड जिल्ह्यात नवे शहर प्रस्तावित करण्यात आले आहे, त्यामुळे येत्या काळात सिडकोच्या कामाचा पसारा वाढणार आहे. त्यामुळेच आयएएस बढती मिळालेले अतिरिक्त जिल्हाधिकारी एस. एस. पाटील यांची सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील हे मागील तीन-साडेतीन वर्षांपासून अतिक्रमण विभागाचे मुख्य नियंत्रक म्हणून काम पाहत आहेत. आता त्यांच्यावर वसाहत-१, वसाहत-२ आणि वसाहत-३ तसेच पणन-१ आणि पणन-२ या महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे एसईझेडचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्यावरच सोपविण्यात आला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी १९ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या आदेशान्वये एस. एस. पाटील यांच्यावरील या जबाबदाºया निश्चित केल्या आहेत. विशेष म्हणजे, पणन, वसाहत तसेच अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग हे सिडकोचे महत्त्वाचे विभाग मानले जातात. सिडकोच्या कामकाजाची संपूर्ण भिस्त याच विभागावर आहे. या महत्त्वपूर्ण विभागाची जबाबदारी एकाच अधिकाºयावर सोपविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सिडकोत सध्या प्राजक्ता लवंगारे-वर्मा आणि अशोक शिनगारे हे दोन सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. प्राजक्ता लवंगारे यांच्याकडे आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना, कार्मिक तसेच वसाहत-३ या विभागाचा कारभार होता. आता त्यांच्याकडील वसाहत-३ हा विभाग काढून तो सिडकोतील तिसºया क्रमांकाचे सहव्यवस्थापकीय संचालक एस. एस. पाटील यांच्यावर सोपविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अशोक शिनगारे यांच्याकडील वसाहत-१ आणि वसाहत-२, पणन-१ आणि पणन-२ या विभागाचा कारभारही एस. एस. पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यांच्यावर सध्या साडेबारा टक्के या एकाच विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर प्राजक्ता लवंगारे यांच्यावर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना आणि कार्मिक विभागाचा कार्यभार कायम ठेवण्यात आला आहे.
एकूणच दोन वरिष्ठ अधिकाºयांच्या अधिकारात कपात करून नव्याने रुजू झालेल्या अधिकाºयांवर महत्त्वाच्या जबाबदाºया सोपविण्यात आल्याने सिडकोतील अधिकारी व कर्मचाºयांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
किसन जावळे यांची बदली; पदभार स्वीकारण्यास टाळाटाळ
सिडकोतील अप्पर जिल्हाधिकारी तथा मुख्य भूमी व भूमापन अधिकारी किसन जावळे यांची राज्य शासनाने तत्काळ बदली केली आहे. त्यांच्यावर आता सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या बदलीसंदर्भात २0 फेब्रुवारी रोजी शासकीय आदेश जारी करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे या आदेशानुसार जावळे यांनी त्याच दिवशी आपल्याकडी जुना कार्यभार सोडून बदली झालेल्या पदाचा तत्काळ कार्यभार स्वीकारणे क्रमप्राप्त आहे. मात्र जावळे हे अद्यापि त्याच पदावर कार्यरत असल्याचे दिसून आले आहे.