वर्धापन दिनानिमित्त थकीत सेवा शुल्क वसुलीसाठी सिडकोची अभय योजना, ...तर ५० टक्के सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 08:12 AM2021-03-19T08:12:37+5:302021-03-19T08:13:38+5:30
सिडकोने आपल्या अधिकार क्षेत्रात विविध सुविधांची पूर्तता केली आहे. विशेषत: रस्ते, मलनि:सारण व्यवस्था, पुराचे पाणी वाहून नेण्यासाठी व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे, घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा, पथदिवे आदी नागरी सुविधांचा यात समावेश आहे.
नवी मुंबई : वर्धापन दिनाचे औचित्य साधून सिडकोने आपल्या अधिकार क्षेत्रातील थकीत सेवा शुल्कवसुलीसाठी अभय योजना जाहीर केली आहे. ही अभय योजना पुढील एक वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे. या कालावधीत सेवा शुल्क भरणाऱ्यांना विलंब शुल्कामध्ये सूट मिळणार आहे. विशेष म्हणजे विलंब शुल्क वगळता ज्यांचे सेवा शुल्क एक कोटीपेक्षा कमी आहे, अशा थकबाकीदारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
सिडकोने आपल्या अधिकार क्षेत्रात विविध सुविधांची पूर्तता केली आहे. विशेषत: रस्ते, मलनि:सारण व्यवस्था, पुराचे पाणी वाहून नेण्यासाठी व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे, घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा, पथदिवे आदी नागरी सुविधांचा यात समावेश आहे. या सुविधांच्या बदल्यात सिडकोकडून भूखंडांचे लीज होल्डर, सहकारी गृहनिर्माण संस्था, बांधकामधारक आदींकडून दर तीन महिन्यांनी सेवा शुल्क आकारले जाते.
प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे १ एप्रिलला सेवा शुल्क आगाऊ भरणे बंधनकारक असते. तसेच यासंदर्भात महामंडळाकडून सेवा शुल्काच्या वसुलीसाठी दर महिन्याला देयके पाठवली जातात. मात्र वारंवार नोटीस बजावूनही अनेकांनी मोठ्या प्रमाणात सेवा शुल्क थकविल्याचे समोर आले आहे. मागील एक वर्षापासून कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या ताळेबंदीचा सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. परिणामी अनेकांना इच्छा असूनही सेवा शुल्काचा भरणा करता आलेला नाही.
या सर्व गोष्टींचा विचार करून थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी ही अभय योजना आणल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाच्या महामारीमुळे मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य थकबाकीदारांना दिलासा देणारी ही योजना आहे.
त्यामुळे अधिकाधिक लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी केले आहे. सिडकोच्या या योजनेमुळे थकबाकीदारांना दिलासा मिळणार आहे.
...तर ५० टक्के सूट
अभय योजनेची जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ६ महिन्यांच्या आत सेवा शुल्क भरणाऱ्या थकबाकीदारांना ७५ टक्के विलंब शुल्क माफ केले जाणार आहे. तर त्यानंतर परंतु बारा महिन्यांच्या आता सेवा शुल्क भरणाऱ्यांना विलंब शुल्कामध्ये ५० टक्के सूट दिली जाणार आहे.