नवी मुंबई : ऐरोली येथे साडेबारा टक्के योजनेसाठी आरक्षित ठेवलेल्या भूखंडावरील अतिक्रमणावर सिडकोने शुक्रवारी धडक कारवाई केली. या भूखंडावर बेकायदेशीरपणे चाळी उभारण्यात आल्या होत्या. कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही चाळ जमीनदोस्त करण्यात आली.शहरात विविध प्रयोजनासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. सिडकोने त्याची गंभीर दखल घेतली असून, कारवाईचा धडाका सुरू केला आहे. ऐरोलीतील अतिक्रमणाला नियमानुसार नोटीस बजावण्यात आली होती; परंतु संबंधिताकडून त्याला प्रतिसाद न मिळाल्याने शुक्रवारी कारवाईचा बडगा उगारण्यात आला.या कारवाईत साडेबारा टक्के योजनेसाठी आरक्षित असलेला ४५० चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात आला. या वेळी उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीखाली उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या शेडवरही या पथकाने कारवाई केली. याअंतर्गत सुमारे १०० शेड काढून टाकण्यात आल्या. या मोहिमेसाठी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अतिक्रमण विभागाचे प्रमुख एस. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रक पी. बी. राजपूत सह नियंत्रक गणेश झिने यांच्या पथकाने ही मोहीम राबविली.दरम्यान, येत्या काळात अशाप्रकारची अतिक्रमणावरील कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याचे सिडकोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
ऐरोलीतील आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणावर सिडकोची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 5:52 AM