पनवेल : खारघर शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर सोमवारी सिडकोने अखेर कारवाईचा बडगा उचलला. रविवारी सिडकोच्या या कारवाईविरोधात सर्वपक्षीय बंद देखील पुकारण्यात आला होता. या बंदला न जुमानता सिडकोने पोलीस, अतिक्रमण विभागातील कर्मचारी व शीघ्र कृती दलातील जवानांच्या चोख बंदोबस्तात शहरातील आठ मंदिरे व एक मदरसा जमीनदोस्त केला.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडकोने २००९ च्या अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. १ ते २९ नोव्हेंबर दरम्यान ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत ही कारवाई खारघरमध्ये करण्यात आली. या कारवाईत सेक्टर ११ मधील साईबाबा मंदिर, सेक्टर ११ मधील महाकाली मंदिर, सेक्टर १९ मधील मुर्बी गावातील दोन ग्रामदेवतांचे मंदिर, सेक्टर १५ स्पॅगेटी गणेश मंदिर , सेक्टर १३ शनी मंदिराचा चौथरा, सेक्टर ३० मदरसा, संत तुकोबाराय चॅरिटेबल ट्रस्टचे मंदिर आदींवर कारवाई करण्यात आली. सिडकोच्या कारवाईत अधिकाºयांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप शेकाप नगरसेवक गुरुनाथ गायकर व शिवसेना शहर प्रमुख गुरुनाथ पाटील यांनी केला.
भाजपा कार्यकर्त्यांच्या धार्मिक स्थळांवर थातूरमातूर कारवाई करून त्यांना या कारवाईतून वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप शेकाप, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. या कारवाईवेळी सिडकोचे अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक शिवराज पाटील, दीपक जोगी, एस.आर. राठोड, अमोल देशमुख, डी. नामवाड, आर. चव्हाण, गणेश गोसावी आदी सिडकोचे अधिकारी उपस्थित होते. तसेच सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड, खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे आदींसह ३०० पोलिसांचा फौजफाटा यावेळी उपस्थित होता.
या कारवाईत सेक्टर १९ मुर्बी गावातील पुरातन ग्रामदेवतेच्या मंदिरावर देखील कारवाई करण्यात आल्याने संतप्त ग्रामस्थांनी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले. मुर्बी गावातील ग्रामस्थ भरत पाटील यांनी सांगितले की, या कारवाईच्या संदर्भात ग्रामस्थांची बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली आहे. याठिकाणचे मंदिर २००९ पूर्वीचे असल्याचे गुगल मॅपवरील पुरावे दाखवून देखील सिडकोने ही कारवाई केली असल्याचे पाटील यांनी सांगितले.