नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे सिडकोच्या अनेक विकास प्रकल्पांची गती मंदावली आहे, तर नियोजित असलेल्या अनेक प्रकल्पांना खीळ बसली आहे. विशेषत: सिडकोच्या ९0 हजार घरांच्या गृहप्रकल्पाच्या निविदा प्रक्रिया रखडल्या आहेत, तर मेट्रोसह नेरूळ-उरण रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम मंदावले आहे.सिडकोच्या माध्यमातून विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यात प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश आहे. विमानतळाची प्रकल्पपूर्व कामे वेगाने सुरू असली तरी अनेक टप्प्यांवर धोरणात्मक निर्णयाअभावी कामांचा वेग कमी झाला आहे. विशेषत: विमानतळामुळे स्थलांतरित होणाºया दहा गावांपैकी तीन गावांचे स्थलांतर अद्याप पूर्ण झालेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सिडकोने सुद्धा यासंदर्भात नरमाईची भूमिका घेतल्याचे समजते. परंतु निवडणुका होताच या कामाला गती प्राप्त होईल, असा विश्वास सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केला आहे. नवी मुंबई मेट्रो हा सिडकोचा दुसरा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाला पेंधर ते बेलापूर हा ११ कि.मी. लांबीचा पहिला टप्पा दृष्टिपथात आला आहे. या मार्गावरील स्थानके तसेच सिग्नल यंत्रणा आणि इतर छोटी छोटी कामे शिल्लक आहेत. मात्र निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून ही कामे सुद्धा कुर्मगतीने सुरू आहेत. नेरूळ-उरण रेल्वेच्या खारकोपरपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचा नोव्हेंबर २0१८ मध्ये शुभारंभ झाला. त्यानंतर उरणपर्यंतच्या दुसºया टप्प्यावर सिडको आणि रेल्वेने लक्ष केंद्रित केले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत हा टप्पाही पूर्ण करण्याचा निर्धार सिडकोने व्यक्त केला आहे. परंतु यात भूसंपादन व पर्यावरण विभागाच्या परवानग्यांचा अडथळा आहे. गेल्या महिन्याभरापासून या संबंधीची कार्यवाही सुद्धा ठप्प पडल्याचे बोलले जात आहे.पंधरा हजार घरांची योजना यशस्वी झाल्यानंतर सिडकोने ९0 हजार नवीन घरांची योजना जाहीर केली आहे. सिडकोच्या इतिहासातील ही सर्वात मोठी गृहयोजना ठरली आहे. या महागृहप्रकल्पासाठी जागाही नियोजित करण्यात आल्या आहेत. त्यासंबंधीचा आराखडाही तयार झाला आहे. बांधकाम सुरू असतानाच घरांसाठी नोंदणी करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार गेल्या महिन्यात या गृहबांधणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याची सिडकोची योजना होती. त्यापाठोपाठ योजना जाहीर करून ग्राहकांकडून अर्ज मागविले जाणार आहेत. परंतु लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नियोजित निविदा प्रक्रियाच रखडली आहे. या प्रमुख प्रकल्पासह सिडकोच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आलेले खारघर येथील मनोरंजन पार्क, मुंबईच्या बीकेसीच्या धर्तीवर खारघर येथे उभारण्यात येणारे कार्पोरेट पार्क, पनवेल रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण, उरण ते आम्रमार्ग कोस्टल रोड, खारघर ते किल्ले गावठाण जलमार्ग आदी प्रकल्पांची गती मंदावल्याचे दिसून आले आहे.९0 टक्के कर्मचारीवर्ग निवडणूक ड्युटीवरलोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून सिडकोतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती रोडावली आहे. कारण सिडकोतील जवळपास ९0 टक्के कर्मचारीवर्ग निवडणूक ड्युटीवर तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे सिडकोच्या विविध विभागातील दैनंदिन कामे प्रभावित झाली आहेत. धोरणात्मक निर्णय घेणे अशक्य झाले आहे. लोकांची कामे रखडली आहेत. निवडणुकीनंतर रखडलेल्या कामांना गती मिळेल, असा विश्वास सिडकोचे अधिकारी व कर्मचाºयांनी व्यक्त केला आहे.
सिडकोच्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांची गती मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 1:36 AM