नवी मुंबई : जेएनपीएससह नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एमएमआरडीएकडून वेगाने विकसित करण्यात येत असलेल्या शिवडी-न्हावा-शेवा सी लिंकमुळे नवी मुंबईतील वाहतुकीवर भविष्यात मोठा ताण येणार आहे. यावर उपाय म्हणून सिडकोने जेएनपीए ते उलवे असा आम्र मार्ग नावाचा कोस्टल रोड प्रस्तावित केला आहे.
या रस्त्यास २०१७ मध्ये सीआरझेडने काही सुधारणा आणि खारफुटी कत्तलीसाठी उच्च न्यायालयाची परवानगी घेण्यास सांगून तत्त्वत: मंजुरी दिली होती. यासाठी सिडको न्यायालयात गेली होती. तेव्हापासून २०१७ न्यायालयाने वेळोवेळी सुनावणी घेऊन, आता एप्रिल महिन्यात सिडकोस पुन्हा नव्याने परिवेश समिती आणि सीआरझेडची सुधारित परवानगी घेण्यास सांगितले होते. त्यामुळे सीआरझेडच्या नुकत्याच झालेल्या १६७व्या बैठकीतही सिडकोने ही परवानगी मागितली होती, परंतु यावेळी सीआरझेड प्राधिकरणाने तुम्ही लवकरात ईआयए अहवालासह सुधारित प्रस्ताव सादर करा, आम्ही लगेच मंजुरी देऊ, असे सांगितले आहे.
या प्रस्तावित मार्गासाठी एकूण ६४.०९ हेक्टर जागा लागणार असून, त्यापैकी २५.७० हेक्टर जागा सीआरझेड क्षेत्रात मोडते. यात खारफुटीचे मोठे नुकसान होणार आहे. यामुळे आता सिडकोस पुन्हा नव्याने या ईआयए अहवालासह सीआरझेड समोर जावे लागणार आहे.
सागरी मार्ग दोन टप्प्यांत बांधणारसिडकोचा हा प्रस्तावित सागरी मार्ग दोन टप्प्यांत बांधण्यात येणार आहे. या मार्गाची एकूण लांबी १०.१०७ किमी आहे. हा सागरी मार्ग पूर्ण झाल्यानंतर, भविष्यात जेएनपीटीला जोडणाऱ्या दुसऱ्या लिंक रोडवर आणि राष्ट्रीय महामार्ग ४- बी आणि राज्य महामार्ग ५४ मार्गे आम्र मार्गावर येणाऱ्या वाहनांची कोंडी कमी होणार आहे. हा सागरी मार्ग बांधकामाधीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक रूट’शीही जोडला जाणार आहे. यात पहिल्या टप्प्यात आम्र मार्ग जंक्शन ते शिवाजीनगर येथील एमटीएचएल आणि तेथून विमानतळापर्यंत जाणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ५.८ किमीचा रस्ता आहे. या टप्प्यातच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी १.२० किलोमीटर लांबीचा रस्ताही बांधण्यात येणार आहे. हा लिंक रोड तरघर रेल्वे स्थानकापासून सुरू होईल आणि नेरुळ-उरण रेल्वे मार्गाने आणि आम्र रोडवरून विमानतळाला जोडण्यात येणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात ते शिवाजीनगर ते जेएनपीटी (बेलपाडा) बांधण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मार्गाची एकूण लांबी ४.३०६ किमी असेल.
कांदळवनाच्या सुरक्षेसाठीया प्रस्तावित सागरी मार्गाच्या मार्गावर उलवे खाडीच्या काठावर कांदळवन (खारफुटीची) जंगलेही आहेत. त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी नोडल रोड जंक्शन येथे तीन उड्डाणपूल, १.२ किमी लांबीचे आणि ०.६ किमी लांबीचे दोन आरसीसी स्टिल्ट पूल बांधण्याचे नियोजन आहे. त्याचप्रमाणे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या लिंक रोडसाठी सीवूड-उरण रेल्वे मार्ग आणि आम्र रोडवर १ उडाणपूल (रेल्वे ओव्हर ब्रिज) (वाया डक्ट) बांधण्यात येणार आहे.