सिडकाेच्या अर्थसंकल्पाने दहा हजार कोटींचा टप्पा ओलांडला, गृहनिर्मिती आणि पाणीपुरवठ्यावर अधिक भर
By कमलाकर कांबळे | Published: March 30, 2023 08:56 PM2023-03-30T20:56:11+5:302023-03-30T20:56:40+5:30
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या आर्थिक वर्षासाठी १० हजार ५४४ कोटी रुपये जमा तर १० हजार ४९८ कोटी खर्चाचा आणि ४६६ कोटी रुपये शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर केला आहे.
नवी मुंबई : राज्यातील श्रीमंत महामंडळ म्हणून ओळख असलेल्या सिडकोने यावर्षीच्या अर्थसंकल्पात दहा हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. यावर्षीच्या अंदाजपत्रकात पाणीपुरवठा आणि गृहनिर्मितीसाठी भरीव तरतूद केली आहे. गृहनिर्मितीसाठी तब्बल ३ हजार ७५१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या आर्थिक वर्षासाठी १० हजार ५४४ कोटी रुपये जमा तर १० हजार ४९८ कोटी खर्चाचा आणि ४६६ कोटी रुपये शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात विविध स्वरुपाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना देण्याच्या दृष्टीने भरीव तरतूद केली आहे. मेट्रो प्रकल्पांवर ८९१ कोटींचा खर्च अपेक्षित धरला असून नैना प्रकल्पाच्या विकासासाठी २४३ कोटींची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे मार्केटिंग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अग्निशमन, नवीन पालघर आदींवर ४ हजार १५६ कोटी रुपये ठेवले आहेत. विशेष म्हणजे २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी महसुली खर्चाचा अंदाज २७४६ कोटी तर भांडवली खर्चाचा अंदाज ७७५१ कोटी दर्शविला आहे. २०२२ २३ च्या सुधारित अंदाजपत्रकापेक्षा यावर्षीचा अर्थसंकल्प २१.७९ टक्क्यांनी जास्त आहे.
उत्पन्नाचे अंदाजित स्त्रोत -
- मार्केटिंग, शहर व वसाहत अग्निशमन आदी विभाग : ४ हजार ७६५ कोटी
- गृहविक्री : ५ हजार ५०७ कोटी
- मेट्रो प्रकल्प : २७४ कोटी
- पाणीपुरवठा : ९४८ कोटी
- नैना प्रकल्प : १७३ कोटी
- नवे शहरे : १२६ कोटी
- रेल्वे प्रकल्प : ६ कोटी ५२ लाख
- एकूण अपेक्षित उत्पन्न : १० हजार ५४४ कोटी