११ हजार ९०० कोटींचा सिडकोचा अर्थसंकल्प, विमानतळ, मेट्रोसह ‘नैना’च्या पूर्ततेचा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 02:29 PM2024-03-07T14:29:02+5:302024-03-07T14:29:16+5:30

विजय सिंघल यांनी दोन आठवड्यांपूर्वी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर विविध प्रकल्पांचा आढावा घेऊन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना देण्याचा निर्णय घेतला आहे.

CIDCO's budget of 11 thousand 900 crores | ११ हजार ९०० कोटींचा सिडकोचा अर्थसंकल्प, विमानतळ, मेट्रोसह ‘नैना’च्या पूर्ततेचा संकल्प

११ हजार ९०० कोटींचा सिडकोचा अर्थसंकल्प, विमानतळ, मेट्रोसह ‘नैना’च्या पूर्ततेचा संकल्प

नवी मुंबई :  चालू आर्थिक वर्षात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह, मेट्रो, नैना आणि पाणीपुरवठा योजनेवर अधिक भर देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात या सर्व प्रकल्पांसाठी भरीव तरतूद केली आहे.  या आर्थिक वर्षाचा ११ हजार ९०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी बुधवारी संचालक मंडळास सादर केला. यात  गृहनिर्माण योजनेसाठी सर्वाधिक म्हणजेच ४ हजार १८ कोटींची तरतूद केली आहे. 

विजय सिंघल यांनी दोन आठवड्यांपूर्वी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर विविध प्रकल्पांचा आढावा घेऊन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ११ हजार ९०२ कोटी  ६९ लाख रुपये जमा आणि ११ हजार ८३९ कोटी २९ लाख रुपये खर्चाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी  भरीव तरतूद केली आहे. सिडको विविध घटकांसाठी ८७ हजार घरे बांधत आहे. त्यासाठी या आर्थिक वर्षात ४ हजार १८ कोटींची तरतूद केली आहे.

पालघर प्रकल्प, कॉर्पोरेट पार्कला गती
पाणीपुरवठा योजनेसाठी ७३० कोटी १६ लाखांची तरतूद केली आहे. नैना  प्रकल्पासाठी अनुक्रमे ५६९ कोटी ३७ लाख रुपये, तर मेट्रोच्या विस्तारासाठी ६१० कोटींची तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे नोडल क्षेत्रातील सार्वजनिक कामे, उलवे सागरी 
मार्ग, रेल्वे प्रकल्प, पालघर प्रकल्प, काॅर्पोरेट पार्कला गती देऊन नव्या शहरांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात भरीव निधी ठेवला आहे. 

आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना, महागृहनिर्माण योजना आदींसह सिडकोचे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. हे प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यानुसार अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे.
- विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको
 

Web Title: CIDCO's budget of 11 thousand 900 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.