आचारसंहितेपूर्वी सिडकोचा २५ हजार घरांचा बंपर धमाका! प्रथम येणाऱ्यास हक्काचे घर देण्याचा विचार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 01:05 PM2024-08-29T13:05:52+5:302024-08-29T13:06:22+5:30
चार वर्षांत ६७ हजार घरे बांधणार.
कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सिडकोने मागील सात वर्षांत विविध घटकांसाठी २५ हजारांपेक्षा अधिक घरांची निर्मिती केली असून पुढील चार वर्षांत चार टप्प्यात आणखी ६७ हजार घरे बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यातील ४१ हजार घरांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. त्यापैकी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी २५ हजार घरे सिडको विक्रीस आणणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व घरे ‘निवडा तुमच्या आवडीचे घर’ या संकल्पनेंतर्गत ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर उपलब्ध करण्याची सिडकोची योजना असल्याचे समजते.
सिडको सध्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी विविध नोडमध्ये घरे बांधत आहे. सध्या तळोजा, वाशी, जुईनगर, खारघर, कामोठे, मानसरोवर, करंजाडे, कळंबोली आदी नोडमध्ये गृहप्रकल्पांची बांधकामे सुरू
आहेत.
सर्वाधिक म्हणजेच जवळपास २१ हजार घरे एकट्या तळोजा नोडमध्ये बांधली जात आहेत. असे असले तरी मानसरोवर, खारघर, जुईनगर आणि वाशी येथील घरे मोक्याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे ग्राहकांना या प्रकल्पांतील घरांच्या योजनेची प्रतीक्षा आहे. आचारसंहितेपूर्वी प्रस्तावित केलेल्या गृहयोजनेत कोणत्या प्रकल्पांतील घरांचा समावेश करायचा, यासंदर्भात संबधित विभागाने चाचपणी सुरू केली आहे.
बुक माय सिडको होम
विशेष म्हणजे या घरांसाठी ‘बुक माय सिडको होम’ अर्थात ‘निवडा तुमच्या आवडीचे घर’ या नवीन संकल्पनेचा अवलंब करण्याची योजना आहे. याअंतर्गत ग्राहकांना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर त्यांच्या पसंतीचे घर उपलब्ध करून दिले जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. या अंतर्गत विमान तिकिटाच्या धर्तीवर ग्राहकांना आपल्या पसंतीचे घर सिलेक्ट करण्याचे स्वातंत्र्य असे. ही सर्व घरे संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहेत. यात घराचे क्षेत्रफळ, नकाशा तसेच किंमत आदीचा इत्यंभूत तपशील असेल. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर डिपॉझिट भरून घर आरक्षित करता येईल.
आतापर्यंतची सर्वात मोठी गृहयोजना
सिडकोच्या माध्यमातून आतापर्यंत विविध घटकांसाठी जवळपास दीड लाख घरे बांधून त्यासाठी वेगवेगळ्या गृहयोजना जाहीर केल्या. २०१८ मध्ये दोन टप्प्यात जवळपास १८ हजार घरांची योजना जाहीर केली होती. आतापर्यंतची ती सर्वात मोठी गृहयोजना ठरली होती. मात्र, आता सिडकोच्या इतिहासात २५ हजार घरांची बंपर योजना प्रथमच जाहीर होत आहे.