महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे सिडकोसमोर आव्हान, आंतरराष्टÑीय विमानतळ, मेट्रो, नैनाचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 04:07 AM2018-12-26T04:07:38+5:302018-12-26T04:08:01+5:30

नव्या वर्षात सिडकोला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.

 CIDCO's challenge to the ambitious projects, international airport, metro, nain planning | महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे सिडकोसमोर आव्हान, आंतरराष्टÑीय विमानतळ, मेट्रो, नैनाचे नियोजन

महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे सिडकोसमोर आव्हान, आंतरराष्टÑीय विमानतळ, मेट्रो, नैनाचे नियोजन

Next

- कमलाकर कांबळे
नवी मुंबई : नव्या वर्षात सिडकोला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. विशेषत: आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना, नवी मुंबई मेट्रो, नेरूळ-उरण रेल्वेचा दुसरा टप्पा आदी महत्त्वपूर्ण प्रकल्पांसह अलीकडेच जाहीर केलेला ९0 हजार घरांच्या मेगागृहप्रकल्पाला मूर्त स्वरूप देण्याचे मोठे आव्हान सिडकोसमोर असणार आहे. विशेष म्हणजे पुढील वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असणार आहे. त्यामुळे आचारसंहितेचा फटका सिडकोच्या गतिमान कार्यप्रणालीला बसण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी सिडकोला कसरत करावी लागणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. डिसेंबर २0१९ मध्ये या विमानतळावरून विमानाचे पहिले उड्डाण होईल, असा दावा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जात आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. असे असले तरी विमानतळाच्या मार्गात येणारे अडथळे दूर करताना सिडकोची दमछाक होत आहे. सध्या विमानतळपूर्व कामे धडाक्यात सुरू आहेत. परंतु विमानतळाच्या मुख्य गाभा क्षेत्रात येणाऱ्या गावांच्या स्थलांतराचा प्रश्न अद्याप जैसे थे आहे. ग्रामस्थांकडून नवनव्या मागण्या पुढे करून स्थलांतराच्या प्रक्रियेत खो घातला जात आहे. त्यामुळे सिडकोची डोकेदुखी वाढली आहे. असे असले तरी ठरलेल्या वेळेतच विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होईल, असा विश्वास सिडकोकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे नव्या वर्षात हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सिडकोला शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. विमानतळापाठापोठ नवी मुंबई मेट्रो हा सिडकोचा आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. विविध कारणांमुळे या प्रकल्पाचीही मागील अनेक वर्षे रखडपट्टी झाली आहे. कंत्राटदारांच्या वादामुळे तीन वर्षे या प्रकल्पाचे काम रखडले. त्यामुळे बेलापूर ते पेंधरपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचा मुहूर्त हुकला. कंत्राटदारांचा वाद संपुष्टात आला आहे. त्यानुसार नवीन कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. आता आॅक्टोबर २0१९ हा मुहूर्त निश्चित केला आहे. विमानतळ प्रकल्पाच्या दृष्टीने मेट्रोला वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे नव्या वर्षातील डेडलाइन हुकणार नाही, या दृष्टीने सिडकोला प्रयत्न करावे लागणार आहेत.
मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या नेरूळ-उरण रेल्वे मार्गावरील खारकोपरपर्यंतचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे. उरणपर्यंतचा दुसरा टप्पा सप्टेंबर २0१९ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार सिडको व मध्य रेल्वेने केला आहे. परंतु दुसºया टप्प्याच्या मार्गात अनेक अडचणी आहेत. विशेषत: भूसंपादन आणि पर्यावरण विभागाची मंजुरी हे कळीचे मुद्दे आहेत.त्यावर मात करून निर्धारित वेळेत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सिडकोसह मध्य रेल्वेला कसरत करावी लागणार आहे. सिडकोने गृहबांधणीच्या आपल्या मूळ धोरणावर लक्ष केंद्रित केले आहे. मागणी तसा घरांचा पुरवठा हे नवीन ब्रीद घेवून सिडकोने गृहबांधणीच्या क्षेत्रात पुन्हा उडी घेतली आहे. त्यानुसार आॅगस्ट महिन्यात पंधरा हजार घरांची योजना जाहीर करून त्याची यशस्वी सोडतही काढण्यात आली. या घरांच्या पहिल्या टप्प्यातील ताबा २0१९ मध्ये देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे हा मध्य गाठण्यासाठी सिडकोच्या संबंधित विभागाला मरगळ झटकावी लागणार आहे. पंधरा हजार घरांची यशस्वी सोडत काढल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सिडकोने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ९0 हजार घरांची आणखी एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. १८ डिसेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाचे औपचारिक भूमिपूजनही करण्यात आले.
मुळात ही घरे शहरातील ट्रक टर्मिनल, बस डेपो तसेच रेल्वे स्थानकांच्या फोअर कोर्ट एरियात प्रस्तावित करण्यात आली आहेत. सध्या हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने पुढील वर्षभरात सिडकोला ठोस कार्यवाही करावी लागणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसह सिडकोशी संबंधित दीर्घकाळ रखडलेले नागरी प्रश्न निकाली काढण्याचे मोठे आव्हान व्यवस्थापनासमोर असणार आहे.

नैनाच्या विकासाला हवी गती
भविष्यातील स्वस्त घरांचे डेस्टिनेशन म्हणून सिडकोच्या नैना क्षेत्राकडे पाहिले जाते. परंतु या क्षेत्राच्या विकासाला म्हणावी तशी गती मिळताना दिसत नाही. गत पाच वर्षांपासून प्लॅनिंग आणि शासनाच्या परवानगीच्या गर्तेत सापडलेल्या नैना प्रकल्पातील पहिल्या नगररचना परियोजना अर्थात टीपी स्कीमला चालू वर्षात मंजुरी मिळाली आहे. नैनाच्या पहिल्यात टप्प्यात २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील दोन वर्षात या क्षेत्रात टप्प्याटप्प्याने सात टीपी स्कीमचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पहिलीच टीपी योजना अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत खोळंबली आहे. त्यामुळे नव्या वर्षात या प्रक्रियेला गती देण्यासाठी सिडकोला कंबर कसावी लागणार आहे.

रखडलेल्या प्रकल्पांना प्राधान्य
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी आपल्या आठ महिन्यांच्या कार्यकाळात ९0 हजार घरांच्या मेगाप्रकल्पाचा अपवाद वगळता एकाही नवीन प्रकल्पाची घोषणा केली नाही. त्यांनी सुरुवातीपासून रखडलेल्या प्रकल्पांवर आपले लक्ष केंद्रित केले. त्यानुसार नेरूळ-उरण रेल्वेचा पहिला टप्पा मार्गी लावला. त्यानंतर त्यांनी आता विमानतळ आणि मेट्रो प्रकल्पावर भर दिला आहे. हे दोन्ही प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्णत्वास नेण्याचा निर्धार लोकेश चंद्र यांनी केला आहे. त्यामुळे आगामी वर्षात खºया अर्थाने त्यांची कसोटी लागणार आहे.

सार्वत्रिक निवडणुकांचे वर्ष
२0१९ या वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. वर्षाच्या शुभारंभाच्याच टप्प्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेताना सिडकोसमोर अडचणी निर्माण होणार आहेत. शिवाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे येथील स्थानिकांचे बहुतांशी प्रश्न सिडकोशी निगडित आहेत. विशेषत: गरजेपोटीच्या बांधकामांचा प्रश्न जटील बनला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर त्यासंदर्भात सकारात्मक धोरण जाहीर होण्याची अधिक शक्यता आहे. तसे झाल्यास त्यावर अंमलबजावणी करण्याची मोठी जबाबदारी सिडकोवर येवून ठेपणार आहे. एकूणच आगामी वर्ष सिडकोसाठी कसरतीचे ठरणार आहे.

Web Title:  CIDCO's challenge to the ambitious projects, international airport, metro, nain planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.