सिडकोची उदासीनता : खारघरच्या सेंट्रल पार्क उद्यानाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 02:56 AM2018-10-03T02:56:16+5:302018-10-03T02:56:59+5:30

सिडकोची उदासीनता : १०० कोटींचा खर्च व्यर्थ; कलाकृतींची मोडतोड; आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उद्यानात कारंजेही बंद

 CIDCO's Depression: Kharghar's Central Park Park's drought | सिडकोची उदासीनता : खारघरच्या सेंट्रल पार्क उद्यानाची दुरवस्था

सिडकोची उदासीनता : खारघरच्या सेंट्रल पार्क उद्यानाची दुरवस्था

Next

नामदेव मोरे 

नवी मुंबई : लंडनच्या हाइडपार्कच्या धर्तीवर खारघरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क उभारण्याची घोषणा सिडकोने केली होती. १०० कोटी खर्च करून २०१० मध्ये पहिला टप्पा पूर्ण केला होता; परंतु आठ वर्षांत उद्यानाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. लोकसंगीताची माहिती देणाऱ्या थीम पार्कमधील कलाकृतींची तोडफोड झाली आहे. कारंजे बंद आहेत. विश्रांतीसाठीच्या स्मार्ट हटचे खंडरात रूपांतर झाले असल्याने नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
देशातील सर्वात श्रीमंत महामंडळ अशी ओळख असणारी सिडको भव्य प्रकल्पांची घोषणा करते; परंतु प्रत्यक्षात नागरिकांच्या हिताचे प्रकल्प पूर्ण करत नाही. खारघरमधील सेंट्रल पार्कचीही अशीच स्थिती झाली आहे. येथील २९० एकर जमिनीवर लंडनमधील हाइडपार्कच्या धर्तीवर भव्य उद्यान बनविण्याचा संकल्प करण्यात आला होता. २५ जानेवारी २०१० मध्ये यामधील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. पहिल्या टप्प्यामध्ये भारतीय संस्कृतीची ओळख होईल अशाप्रकारे उद्यानाची रचना केली होती. उद्यानाच्या सुरुवातीलाच पखवाज, पेटी व इतर वाद्यांच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या. समोर तळ्यामध्ये कारंजे बसविण्यात आले होते. अ‍ॅम्पी थिएटरच्या बाजूला नागरिकांना बसता यावे यासाठी स्मार्ट हट ही संकल्पना राबवून निवारा केंदे्र तयार केली होती. भारतीय संगीत कलेतील कथ्थक, भरतनाट्यम् व इतर सर्व नृत्यांची ओळख व्हावी अशाप्रकारचे थीम पार्क तयार केले होते. उद्यानात आवश्यक त्या ठिकाणी प्रशस्त फूडकोर्ट, प्रसाधनगृहांची रचना केली होती.
सिडकोने कागदावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान तयार केले; परंतु प्रत्यक्षात ते साकारू शकले नाही. २०१० मध्ये लोकार्पण केलेल्या पहिल्या टप्प्याचे खंडरात रूपांतर झाले आहे. ८ वर्षांमध्ये एकही फूडकोर्ट सुरू होऊ शकले नाही. प्रवेशद्वारावरील एकच प्रसाधनगृह सुरू ठेवण्यात आले आहे. तलावामधील व आतमधील कारंजे बंदच आहेत. ढोलकी, तबला यांच्या प्रतिकृतींची तोडफोड झाली आहे. स्मार्ट हटचे छप्पर उडाले असून प्रचंड गवत उगवल्यामुळे तेथे उभेही राहता येत नाही. सर्वात गंभीर स्थिती लोकसंगीताच्या थीम पार्कची झाली आहे. येथील नृत्याची माहिती देण्यासाठी उभारलेल्या कलाकारांच्या पुतळ्यांचे हात, पाय तुटले आहेत. लोकसंगीताचा अवमान होत असून त्याकडे प्रशासनाने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. छोट्या अ‍ॅम्पी थिएटरचीही दुरवस्था झाली आहे. मुलांसाठी बसविण्यात आलल्या खेळण्यांचीही दुरवस्था झाली आहे. तब्बल १०० कोटी रुपये खर्च करून बनविण्यात आलेल्या उद्यानाची वाताहत पाहून नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरु केली आहे. सिडकोने नैना परिसरात २३ स्मार्ट सिटी बनविण्याची घोषणा केली होती. दक्षिण नवी मुंबई देशातील पहिले स्मार्ट शहर बनविण्याची घोषणाही केली होती; परंतु प्रत्यक्षात एकही चांगले उद्यान बनविता आले नसल्याची टीका केली जाऊ लागली आहे.

सेंट्रल पार्कमधील वास्तव
च्उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोरील ढोलकी, तबल्याची मोडतोड
च्नागरिकांच्या सुविधेसाठीच्या पाणपोई बंद
च्उद्यानातील नैसर्गिक तलाव व इतर ठिकाणचे कारंजे बंद
च्अ‍ॅम्पी थिएटरची देखभाल करण्याकडे दुर्लक्ष
च्२०१० पासून फूडकोर्ट सुरूच केले नाहीत
च्उद्यानामधील फक्त दोनच प्रसाधनगृहे सुरू
च्आसनव्यवस्थेसाठीच्या स्मार्ट हटची दुरवस्था
च्भारतीय संगीत कलेची माहिती देणाºया थीम पार्कमधील प्रतिकृतींची मोडतोड
च्लहान मुलांसाठीच्या खेळण्यांची मोडतोड

व्यवस्थापकीय संचालकांनी भेट द्यावी
खारघरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान बनविण्याची घोषणा सिडकोने केली होती; परंतु प्रत्यक्षात उद्यानाचे खंडरात रूपांतर झाले आहे. उद्यानाची अवस्था पाहिल्यानंतर नागरिक सिडकोच्या कार्यक्षमतेवरच टीका करू लागले आहेत. सिडको घोषणा करते; परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी करत नाही. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सेंट्रल पार्कला भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

पहिला टप्पाच फसला : सेंट्रल पार्क दोन टप्प्यात करण्याचे नियोजन केले होते. प्रत्यक्षात पहिला टप्पा नियोजनाप्रमाणे कार्यान्वित करता आलेला नाही. सिडकोचे नियोजन पूर्णपणे फसले असून उद्यान निर्मितीवर केलेला खर्च व्यर्थ गेला आहे. यामुळे दुसरा टप्पा कधी व कसा पूर्ण केला जाणार, असा प्रश्नही नागरिक विचारू लागले आहेत.

नागरिकांची निराशा
खारघरमधील सेंट्रल पार्क किती भव्य आहे याची माहिती सिडकोच्या संकेतस्थळावरही देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान अशी जाहिरात करण्यात आली आहे. ही माहिती पाहून मुंबई, नवी मुंबई परिसरातूनही नागरिक उद्यान पाहण्यासाठी येत आहेत; परंतु उद्यानाची अवस्था पाहून निराशा होऊ लागली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उद्यानाच्या नावाने सिडकोने फसवणूक केल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

Web Title:  CIDCO's Depression: Kharghar's Central Park Park's drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.