लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पसंतीचे घर न मिळालेल्या ग्राहकांच्या माथी विक्रीविना पडून असलेली तळोजातील घरे मारण्याचा आटापिटा सिडकोकडून सुरू आहे. त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करून अनेक ग्राहकांनी सिडकोने दिलेला पर्याय धुडकावून घरे सरेंडर करण्याचा धडाका लावला आहे. त्यासाठी सिडकोच्या संबंधित विभागात ग्राहकांची गर्दी होताना दिसत आहे.
शिवजयंतीच्या मुहूर्तावर काढलेल्या संगणकीय सोडतीत पसंतीचे घर न मिळालेल्या १८८१ अर्जदारांना सिडकोने तळोजातील घरांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे ग्राहकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, ही घरे घ्यायची की नाही, याचा निर्णय संबंधित ग्राहकांनी घ्यायचा आहे. त्यासाठी संबंधित ग्राहकांना आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. परंतु, अनेकांनी हा प्रस्ताव धुडकावून लावून तसे सिडकोला कळवले आहे. त्यामुळे विक्रीविना पडून असलेली घरे विकायची कशी? असा प्रश्न आता सिडकोसमोर उभा ठाकणार आहे.
गुढीपाडव्याला पुन्हा सोडत?शिल्लक राहिलेल्या घरांसाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा सोडत काढण्याचा निर्णय सिडकोने घेतल्याचे समजते. कारण २६ हजार घरांसाठी केवळ २१ हजार ३९९ अर्जदारांनी अनामत शुल्क भरले होते. त्यापैकी १९,५१८ अर्जदारांना त्यांच्या पसंतीचे घर मिळाले आहे. म्हणजे या योजनेतील ६४८२ घरे विक्रीविना पडून आहेत. शिवाय कागदपत्रांच्या छाननीनंतर अनेक यशस्वी अर्जदार बाद होण्याची शक्यता आहे. ही बाब गृहित धरून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिल्लक घरांसाठी नवीन सोडत काढण्याची योजना सिडकोत आखली जात असल्याचे समजते.