अनधिकृत बांधकामांवर सिडकोचा हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2023 12:17 PM2023-06-23T12:17:14+5:302023-06-23T12:17:29+5:30
गोठीवलीतील सेक्टर २४ येथील भूखंडावर आरसीसी चालू बांधकाम तसेच तळवली गावातील सेक्टर २२ येथील मोकळ्या भूखंडावर अनधिकृरीत्या आरसीसी बांधकाम सुरू होते.
नवी मुंबई : घणसोली ‘एफ’ विभागात गोठीवली गाव आणि तळवली परिसरातील मोक्याच्या ठिकाणी नव्याने बांधकाम सुरू असलेल्या दोन अनधिकृत इमारतींवर सिडकोच्या अनधिकृत बांधकामेविरोधी पथकाने गुरूवारी (२२ जून) दुपारी पोलिस बंदोबस्तात धडक कारवाई करून बांधकाम पाडले.
गोठीवली परिसरात नव्याने आरसीसी बांधकामे सुरू असल्याच्या लेखी तक्रारी येथील सामाजिक कार्यकर्ते दीनानाथ म्हात्रे यांच्यासह काही नागरिकांनी सिडको आणि नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे केल्या आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार सिडकोच्या अतिक्रमण विभागाने येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे.
मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण
गोठीवलीतील सेक्टर २४ येथील भूखंडावर आरसीसी चालू बांधकाम तसेच तळवली गावातील सेक्टर २२ येथील मोकळ्या भूखंडावर अनधिकृरीत्या आरसीसी बांधकाम सुरू होते. सिडकोचे अतिक्रमण विभागाचे मुख्य नियंत्रक संजय जाधव, सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केली.