कळंबोली : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडकोने शुक्रवारी कळंबोलीतील नऊ मंदिरांवर हातोडा टाकला. स्थानिक रहिवासी आणि भाविकांनी या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो मोडीत काढत अतिक्रमण विरोधी मोहिमेला अडथळा येवू दिला नाही. सिडको वसाहतीतील सर्व अनधिकृत प्रार्थना स्थळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले.सिडको वसाहतीत मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अतिक्र मण करण्यात आले आहे. त्यावर अनधिकृत मंदिरे उभारण्यात आली आहेत. सिडकोने रिलीजन पॉलिसी ठरवून प्रार्थना स्थळांकरिता भूखंड राखीव ठेवले आहेत, परंतु अनेक ठिकाणी पक्के बांधकाम करून मंदिरे बांधण्यात आली आहेत. त्यामध्ये बहुतांशी राजकीय मंडळींनी आपल्या महत्त्वाकांक्षेचा विस्तार करण्याकरिता या मंदिराचा वापर केला असल्याचे कळंबोलीत दिसून आले. उच्च न्यायालयाने २००९ नंतरच्या अनधिकृत प्रार्थना स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते. गुरुवारी उच्च न्यायालयाने अतिक्र मणाविरोधात ताशेरे ओढले होते. याची दखल घेत सिडकोने कळंबोलीत अनधिकृत बांधण्यात आलेल्या मंदिरांविरोधात मोहीम हाती घेतली. मुख्य नियंत्रक शिवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली नियंत्रक दीपक जोगी, सहायक नियंत्रक एस.आर. राठोड, बीट अधिकारी डी.झेड. नामवाड, अमोल देशमुख या अधिकाºयांसह १०० कामगार कळंबोलीत सकाळी दहा वाजता धडकले. त्यांच्या सोबत दोन पोकलेन आणि इतर साहित्य होते. त्याचबरोबर कारवाईत अडथळा येवू नये म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पोपेरे यांच्या नेतृत्वाखाली शंभर पोलीस कर्मचाºयांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सेक्टर ६ येथील स्वामी समर्थ ध्यान केंद्रावर कारवाई करीत असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना आवर घातला. सेक्टर १४ येथील विठ्ठल आणि शनी मंदिरावर हातोडा मारीत असताना पोपेरे यांच्या आदेशानुसार चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.२००९ नंतर सिडकोच्या राखीव भूखंडावर अतिक्रमण करण्यात आलेल्या मंदिरावर आम्ही कारवाई करीत आहोत. पुढील महिनाभर ही मोहीम सुरू राहणार आहे. त्यामध्ये कामोठे, नवीन पनवेल, खारघर, सीबीडी, रबाळे, उरण, नेरूळ, कोपरखैरणे, एमआयडीसी रबाळे आणि न्हावा शेवा या ठिकाणी १ ते २९ दरम्यान अनधिकृत मंदिरांवर कारवाई करण्यात येईल.- शिवराज पाटील,मुख्य बांधकाम नियंत्रक, सिडको
कळंबोलीतील नऊ मंदिरांवर सिडकोचा हातोडा, रहिवाशांचा विरोध पोलिसांनी काढला मोडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 4:06 AM