कमलाकर कांबळे, नवी मुंबईकरारनाम्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या भूखंडधारकांवर सिडकोची संक्रांत ओढावली आहे. परवानगी न घेता मनमानी पध्दतीने भूखंडाचा वापर करणाऱ्यांवर सिडकोने टाच आणली आहे. आतापर्यंत शहरातील तीन बड्या भूखंडांचे वाटप रद्द करण्याची कारवाई सिडकोने केली आहे. येत्या काळात शेकडो भूखंड सिडकोच्या रडारवर असल्याचे समजते.शहराची निर्मिती करताना सिडकोने विविध प्रयोजनासाठी भूखंड आरक्षित ठेवले आहेत. त्यातील काही भूखंड शिक्षण संस्था, अभियांत्रिकी कॉलेजेस, रुग्णालये व सामाजिक संस्थांना अगदी नाममात्र दरात दिले आहेत. या भूखंडाचे वाटप करताना सिडकोने घालून दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे संबंधितांना बंधनकारक आहे. परंतु मागील दीड दोन दशकात यातील अनेक भूखंडधारकांनी सिडकोबरोबर झालेल्या करारनाम्यातील अटी व शर्तींना केराची टोपली दाखविल्याचे दिसून आले आहे. सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून गेल्या महिन्याभरात अरुणाचल प्रदेश सरकारला अतिथीगृहासाठी वाशी रेल्वे स्थानकाजवळ दिलेले भूखंड वाटप रद्द करण्यात आले आहे. संबंधित व्यवस्थापनाने करारातील अटी व शर्तीचा भंग करीत भूखंडाचा व्यावसायिक वापर केल्याचा ठपका सिडकोने ठेवला आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ दोन दिवसांपूर्वी सिडकोने महापालिकेलाही दणका दिला आहे. सार्वजनिक रुग्णालयासाठी सिडकोने महापालिकेला वाशी सेक्टर १0 येथे आठ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड दिला आहे. परंतु महापालिकेने यातील एक लाख चौरस फुटाची जागा हिरानंदानी हेल्थ केअरला दिली आहे. या जागेवर हिरानंदानीने सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारून परस्पर कराराने ते चालविण्यासाठी फोर्टीजला दिले आहे. या सर्व प्रक्रियेत सिडकोबरोबर करारनाम्याचे उल्लंघन झाल्याचा ठपका सिडकोने महापालिकेवर ठेवला आहे. त्यानुसार सदर भूखंड वाटप रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. सहा महिन्यांपूर्वी वाशी रेल्वे स्थानकासमोरील तुंगा हॉटेललाही सिडकोने नोटीस बजावून त्यांचे भूखंड वाटप रद्द केले होते. एकूणच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय न करण्याचा पवित्रा सिडकोने घेतला आहे.
शेकडो भूखंडांवर सिडकोची टाच
By admin | Published: January 22, 2016 2:24 AM