नवी मुंबईत सिडकोच्या शेकडो शिल्लक घरांवर डल्ला ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:56 AM2019-06-03T00:56:33+5:302019-06-03T00:56:43+5:30
अधिकारी-दलालांचे संगनमत : अनेक मालमत्तांवर बेकायदेशीर ताबा
कमलाकर कांबळे
नवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून शहराच्या विविध विभागात आतापर्यंत जवळपास दीड लाख घरांची निर्मित्ती करण्यात आली आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या घरांची विक्री करण्यात आली; परंतु यातील अनेक घरे अद्यापि विक्रीविना पडून आहेत. एकट्या कोपरखैरणे विभागात ८४३ घरे शिल्लक आहेत. विक्रीविना पडून असलेली शेकडो घरे हडप करण्यात आली आहे. संबंधित विभागातील अधिकारी व दलालांच्या संगनमताने या घरांवर डल्ला मारल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे, अनेक मालमत्ता बळकावण्यात आल्या आहेत. वर्षेनुवर्षे पडून असलेल्या घरांची डागडुजी करून त्याची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. या संदर्भात सिडकोच्या संबंधित विभागाने ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष केल्याने या प्रकाराला चालना मिळत असल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.
सिडकोने १४ नोड विकसित केले आहेत. या नोडमध्ये जुन्या व नवीन प्रकल्पातील २८१३ घरे शिल्लक असल्याचे दोन वर्षांपूर्वी सिडकोने केलेल्या सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले आहे. यात व्यावसायिक गाळ्यांसह विविध आकाराच्या सदनिकांचा समावेश आहे. शिल्लक राहिलेल्या या मालमत्तांची सोडत काढून विक्री करण्याची सिडकोची योजना आहे; परंतु मागील दोन वर्षांपासून या दृष्टीने कोणतीही कार्यवाही झाली नाही. सिडकोची ही उदासीनता दलालांच्या पथ्यावर पडली आहे. विविध विभागात विक्री न झालेल्या घरांची माहिती संकलित करून त्यांची बेकायदेशीरपणे विक्री केली जात आहे. सध्या ऐरोली ते पनवेल दरम्यान सिडकोच्या १४ नोडमध्ये हा गोरखधंदा तेजीत सुरू असल्याचे दिसून आले आहे. विशेषत: कोपरखैरणे, घणसोली नेरुळ, वाशी, बेलापूर या विभागातील शिल्लक घरांना मागील दोन वर्षांत पाय फुटल्याचे बोलले जात आहे.
केंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेअंतर्गत सिडकोने गृहबांधणीवर भर दिला आहे. गेल्या वर्षी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी १५ हजार घरांची योजना जाहीर करून त्याची सोडत काढण्यात आली. पुढील दोन- तीन महिन्यांत आणखी ९० हजार घरे बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे शिल्लक घरांच्या प्रश्नाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. असे असले तरी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी शिल्लक घरांची सोडत काढून नियमानुसार विक्री केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचनाही यापूर्वीच संबंधित विभागाला दिल्या आहेत; परंतु विविध नोडमध्ये विक्रीविना पडून असलेल्या २,८१३ मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी कोणतीही प्रभावी योजना राबविण्यात आलेली नाही. याचा परिणाम म्हणून मागील दोन वर्षांत यापैकी अनेक मालमत्ता गिळकृंत करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
रिकाम्या घरांत बेकायदेशीर वास्तव्य
सिडकोने बेलापूर व वाशी येथील रेल्वे स्थानकांवरील मालमत्ता आयटी कंपन्यांना विकल्या. तरीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुकाने व गाळे विक्रीविना पडून आहेत. यात स्वप्नपूर्ती, व्हॅलीशिल्प, सेलिब्रिशन, वास्तुशिल्प, स्पेगेटी यासारख्या नवीन संकुलांत बांधण्यात आलेल्या घरांचाही समावेश आहे. अनेक वर्षे या मालमत्ता वापराविना आहेत. त्यामुळे त्यांची पडझड झाली आहे. अनेक घरांत बेकायदेशीररीत्या वास्तव्य सुरू आहे. वर्षानुवर्षे पडून असलेल्या घरांत मागील दोन वर्षात अचानक वास्तव्य सुरू झाल्याने शेजारी राहणाऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.
‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर सर्वेक्षण
सिडकोच्या शिल्लक घरांच्या अपहाराबाबत जानेवारी २0१७ मध्ये ‘लोकमत’मध्ये वृत्त मालिका प्रसिद्ध करण्यात आली होती. या वृत्ताची दखल घेत सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी शिल्लक घरांचा तपशील गोळा करण्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक केली होती. संस्थेच्या सर्वेक्षणानुसार विविध नोडमध्ये जुन्या आणि नवीन अशा २८१३ मालमत्ता विक्रीविना पडून असल्याचे स्पष्ट झाले होते. यात व्यावसायिक गाळे, निवासी व मोकळ्या भूखंडांचा समावेश आहे.