येस बँकेत सिडकोचीही रक्कम अडकली; गृहप्रकल्पातील लाभार्थीचे हप्ते रखडले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 08:20 PM2020-03-06T20:20:45+5:302020-03-06T20:21:17+5:30
मोठय़ा प्रमाणात बुडालेली कर्जे व नवीन भांडवल उभे करण्यात असमर्थ ठरत असल्याच्या कारणावरून येस बँकेवर आरबीआयने र्निबध घातले आहेत.
नवी मुंबई : आरबीआयने येस बँकेवर आणलेल्या र्निबधांचा फटका सिडकोच्या गृह प्रकल्पातील लाभार्थीनाही बसला आहे. सिडकोचे येस बँकेत खाते असल्याने त्यावरील व्यवहार ठप्प झाल्याने वित्त संस्थांकडून ग्राहकांच्या हप्त्याची रक्कम जमा होऊ शकलेली नाही. परंतु या प्रकारामुळे सिडकोची कोटय़वधीची रक्कम येस बँकेत अडकण्याची शक्यता निर्माण झाली असून सिडकोकडून यासंदर्भातचे स्पष्टीकरण होऊ शकले नाही.
मोठय़ा प्रमाणात बुडालेली कर्जे व नवीन भांडवल उभे करण्यात असमर्थ ठरत असल्याच्या कारणावरून येस बँकेवर आरबीआयने र्निबध घातले आहेत. या कालावधीत बँकेच्या ग्राहकांच्या व्यवहारावर मर्यादा घालण्यात आली आहे. पीएमसी बँकेनंतर येस बँकेच्या ग्राहकांना बसलेला हा मोठा झटका आहे. त्याचा फटका सिडकोच्या गृहप्रकल्पातील लाभाथ्र्यानाही बसला आहे. मागील दोन वर्षात सिडकोकडून काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये सुमारे पंधरा हजार लाभाथ्र्यानी सिडकोची घरे मिळवली आहेत. वेगवेगळ्या वित्त संस्थांकडून त्यांच्या घराचे हप्ते सिडकोकडे जमा होत आहेत. त्यासाठी सिडकोकडून येस बँकेतील खात्याचा वापर केला जात आहे. यानुसार खात्यामध्ये कोटय़वधीची रक्कम जमा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु येस बँकेवर आलेल्या र्निबधामुळे सिडकोच्याही बँक खात्याचे व्यवहार ठप्प झाले आहेत.
याचा परिणाम गुरुवारी संध्याकाळपासून घराच्या हप्त्याची रक्कम ऑनलाइन भरणा करण्याच्या प्रक्रियेवर झाला आहे. त्यामुळे मंजूर झालेल्या कर्जाचा हप्ता सिडकोच्या बँक खात्यात जमा होत नसल्याचे संबंधित वित्त संस्थांकडून सदनिकाधारकांना कळवले जात आहे. विशेष म्हणजे चौथ्या हप्त्याचा शनिवारी शेवटचा दिवस असताना, एक दिवस अगोदरच ही समस्या उद्भवल्याने सदनिकाधारक अधिक चिंतित आहेत. त्यापैकी अनेकांनी सिडकोवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
सिडको ही शासकीय संस्था असतानाही राष्ट्रीयीकृत बँकेत खाते ठेवणो आवश्यक असतानाही खासगी बँकेत खाते ठेवण्यामागच्या कारणांच्या चौकशीची मागणी होऊ लागली आहे. तर येस बँकेतील खात्यामुळे ऑनलाइन भरणा प्रक्रिया काही कालावधीसाठी स्थगित केल्याची सूचना सिडकोकडून संकेतस्थळावर देण्यात आली आहे. परंतु यासंदर्भात सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रतांबे यांच्याकडे चौकशी करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.